सासरच्या लोकांनी मासिक पाळीतील रक्त विकण्यासाठी पुण्यातील एका महिलेचा छळ केल्याचं अघोरी प्रकरण उघड झालं. यानंतर एकच खळबळ उडाली. राज्यभरात या घटनेची चर्चा होत आहे. मात्र, पीडित महिला मागील दोन-अडीच वर्षांपासून पोलीस स्टेशनचे हेलपाटे घालत होती. अनेकदा हेलपाटे मारूनही पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला नाही, अशी तक्रार पीडितेने केली. याबाबत पुणे पोलिसांना विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी शुक्रवारी (१० मार्च) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

पोलीस म्हणाले, “पीडित महिला ज्या दिवशी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला आली त्याचदिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदाचित बीडमध्ये सासरी स्थानिक पोलिसांकडे गेली असावी. याबाबत आम्हाला अधिक माहिती नाही.”

“हा गुन्हा बीडमध्ये घडला आहे. त्यामुळे आम्ही हा गुन्हा दाखल करून घेऊन याचे कागदपत्र बीड पोलिसांकडे तपासासाठी पाठवले आहेत. अद्याप या प्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

नेमकं काय घडलं?

पोलीस म्हणाले, “एका २७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. ती विश्रांतवाडीतील रहिवासी आहे. २०१९ मध्ये तिचं लग्न झालं. लग्नानंतर ती पुण्यातील चंदननगर-फुरसुंगी येथे राहत होती. त्यावेळी सासरी सासू-सासरे, नवरा यांनी तिला त्रास दिला. यानंतर तिने नवरा आणि सासू-सासऱ्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती.”

“पोलीस तक्रारीनंतर सासरच्या लोकांनी तिची समजूत काढली आणि २०२१ मध्ये तिला नांदवण्यासाठी बीड जिल्ह्यातील मूळ गावी नेले. २०२२ मध्ये महिलेचे पती कामानिमित्त बाहेर गेले असताना तिच्या दिराने तिच्याकडे मासिक पाळीतील रक्ताची मागणी केली. ही विचित्र गोष्ट ऐकल्यानंतर या महिलेने या असल्या गोष्टी माझ्याकडे कशा मागू शकता, अशी विचारणा केली,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

“मासिक पाळीचं रक्त विकून मिळणार होते ५० हजार रुपये”

पोलीस पुढे म्हणाले, “पीडित महिलेने दिराला जे हवं ते तुमच्या पत्नीकडून घ्या असं सांगितलं. यावर दिराने सांगितलं की, ज्या महिलेला मुलबाळ झालेलं नाही त्याच महिलेच्या मासिक पाळीतील रक्ताची गरज आहे. ते रक्त विकून त्याला त्याचे ५० हजार रुपये मिळणार होते. यानुसार महिलेच्या ईच्छेविरुद्ध दिर, मावस दिर, भाचा आणि शेजारी राहणारा एक व्यक्ती यांनी मिळून महिलेची मासिक पाळी असताना तिचं रक्त काढलं.”

हेही वाचा : VIDEO: सासरच्यांनी सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीचं रक्त विकलं, चंद्रकांत पाटील म्हणाले, “भयंकर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, कलम ३७७, कौटुंबिक त्रासासाठी कलम ४९८ आणि अघोरी कृत्य केल्याप्रकरणी त्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असं पोलिसांनी सांगितलं.