पुणे : ‘बलात्कार प्रकरणातील पीडित महिलांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आल्यानंतर एका विभागातून दुसऱ्या विभागात नेण्यात येते. ही एक प्रकारे हेळसांड आहे. ही पद्धत बदलण्याची गरज आहे. वैद्यकीय तपासणीसाठी पीडितांना एक दिवसाहून अधिक काळ थांबावे लागते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे,’ अशी सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्य महिला आयोगाच्या बैठकीत सोमवारी केली.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयास भेट दिली. चाकणकर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस पोलीस अधिकाऱ्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे, तसेच स्वारगेट बलात्कार प्रकरणाबाबत आढावा घेण्यात आला.

‘बलात्कार प्रकरणातील पीडित महिलांना एका विभागातून दुसऱ्या विभागात नेणे ही एक प्रकारची हेळसांड आहे. ही पद्धत बदलण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पीडित महिलांची एका दिवसात तपासणी करण्यात यावी. सर्व तपासण्या एकाच ठिकाणी करण्यात याव्यात’, असे त्यांनी नमूद केले. त्यानंतर चाकणकर यांनी ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. यल्लाप्पा जाधव यांना उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीची तपासणी एका पुरुष वैद्यकीय तज्ज्ञाने केली. संबंधित तपासणी महिला तज्ज्ञाकडून करता आली असती. याबाबत पीडित तरुणीने पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात नाराजी व्यक्त केली होती.