पुण्यातील गुन्हेगारी घटना, अपघात, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित अत्याधुनिक कॅमेरे बसविले आहेत. देशातील अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणाली पुणे शहरात कार्यान्वित झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे नुकतेच उद्घाटन झाले. गृहमंत्री फडणवीस यांनी उद्घाटन सोहळ्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कौतुक केले, तसेच आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेपासून कोणीच वाचू शकणार नाही, असा इशाराही सराइतांना दिला. बेशिस्त, बेदरकार, नियमभंग करणारे वाहनचालक, तसेच गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी या यंत्रणेची मदतच होणार आहे.

शहरातील वाढते गंभीर गुन्हे, सराइतांच्या हालचाली टिपण्यासाठी पुणे पोलिसांकडून एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसविण्यासाठी राज्य शासनाने ४३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ‘फेस रेकग्निझेशन’ तंत्रज्ञानामुळे गुन्हेगाराची माहिती पोलिसांना म्हणजे पोलीस नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) त्वरित मिळणार आहे.

‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित कॅमेऱ्यांची संख्या आहे २ हजार ८६६. यापूर्वी शहर, तसेच उपनगरांत १३०० कॅमेरे बसविण्यात आले होते. नवीन तंत्रज्ञानावर आधारित कॅमेऱ्यांमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्याचा विस्तार वाढला आहे. यापूर्वी शहरात बसविण्यात आलेले १३०० कॅमेरेही आता ‘एआय’ तंत्रज्ञानानुसार अद्ययावत केले जातील. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पुण्यातीलच नव्हे, तर देशभरातील गुन्हेगारांवर नजर ठेवता येऊ शकते. फरार असलेला दुसऱ्या शहरातील आरोपी पुण्यातील कॅमेऱ्यांद्वारे टिपला गेल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना मिळेल.

शहरातील गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानके, एसटी स्थानकांत हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. फरार आरोपीला हे कॅमेरे टिपतील. गुन्हेगाराने वेशभूषा बदलली, तरी त्याला टिपता येणे शक्य होईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण करण्यासाठी ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’ शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सुरू करण्यात आले. या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. समजा, एखाद्या वाहनचालकाने नियमभंग केला, तर सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित त्याला टिपतील.

या माहितीचे विश्लेषण करण्यात येईल. हे कॅमेरे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) यंत्रणेशी जोडले गेले आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाची माहिती काही मिनिटांत पोलिसांना उपलब्ध होईल. त्यानंतर नियमभंगाचा प्रकार आणि दंडात्मक कारवाईचा संदेश (ई-चलन) त्वरित वाहनचालकाला पाठविला जाईल. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वापर करून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध अशी कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोन महिन्यांत साडेतीन हजार वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कॅमेऱ्यांचा वापर करून शहरातील इतरही प्रमुख रस्त्यांवर आता कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांशी होणारे वादही कमी होतील आणि पोलिसांची कारवाई अधिक परिणामकारक होईल.

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर शहरातील टेकड्यांवर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. शहरातील २२ टेकड्यांवरील सुरक्षाविषयक कामे सुरू झाली आहेत. बोपदेव घाटासह शहरातील प्रमुख टेकड्या आणि निर्जनस्थळी पोलिसांनी एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुण्यातील अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे प्रभावी ‘पोलिसिंग’साठी उपयुक्त ठरणार आहेत. शहरात बसविण्यात आलेले कॅमेरे हे फक्त गुन्हेगारी रोखणे आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी लावण्यात आले आहेत, असे नाही. सार्वजनिक ठिकाणचे वर्तनही कॅमेऱ्यांद्वारे टिपले जाणार असल्याने आता प्रत्येकाने याचे भान राखणे आवश्यक आहे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृती आता महागात पडतील.

rahul.khaladkar@expressindia.com