तळेगाव दाभाडे, चाकण येथील औद्योगिक वसाहतीत गेल्या काही वर्षांपासून श्याम दाभाडे (वय ४३) या नावाची दहशत होती. औद्योगिक वसाहतीतील भंगार मालाची विक्री तसेच कामगार पुरवठय़ाच्या ठेक्यांवर त्याचे नियंत्रण होते. त्याच्या एका दूरध्वनीवर लाखो रुपयांची खंडणी औद्योगिक वसाहतीतून गोळा केली जायची. पंचेचाळीस दिवसांपूर्वी दाभाडे आणि त्याच्या साथीदारांनी तळेगावमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा भरचौकात निर्घृण खून केला होता. शेकडो नागरिकांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. मात्र, दाभाडेचे नाव उच्चारायला स्थानिक नागरिक घाबरत होते, एवढी दहशत श्याम दाभाडे या नावाची होती.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी (२९ नोव्हेंबर) चाकणजवळील अंबू डोंगरावर लपलेला दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे यांना चकमकीत ठार मारले आणि दाभाडेची दहशत संपली. पोलिसांच्या कारवाईमुळे तळेगावमधील नागरिक आणि औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योजकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. तळेगाव दाभाडे, देहू रोड, चाकण येथील औद्योगिक वसाहत भागात दाभाडेने दहशतीच्या बळावर त्याचे साम्राज्य उभारण्याचा प्रयत्न केला होता. तो पदवीधर होता. त्याचे शालेय शिक्षण तळेगावातील एका मिशनरी शाळेत झाले होते. त्यामुळे त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. कायद्याचेही ज्ञान त्याला होते. त्यामुळे तो पोलिसांना जुमानायचा नाही. उलट पोलिसांवरच आरोप करणारे अर्ज दाखल करण्यात तो वाकबगार होता. माहिती आधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी, सचिन शेळके यांच्यासह आणखी एकाचा खून असे तीन खुनाचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. हुशार आणि घातकी गुन्हेगार अशी त्याची ओळख होती, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.
तळेगावमधील खांडके चौकात गेल्या १६ ऑक्टोबर रोजी भाजपचे नगरसेवक शेळके यांचा भरदिवसा खून करून दाभाडे आणि त्याचे साथीदार पसार झाले होते. या प्रकरणात त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले होते. मात्र, तो आणि त्याचा साथीदार शिंदे पोलिसांना गुंगारा देत होते. नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त आयुक्त राजकुमार शिंदे, तानाजी चिखले यांनी दाभाडेला पकडण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम जाधव हे पोलिस दलात ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत चौदा गुंडांना चकमकीत टिपले आहे. जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेळके यांच्या खुनानंतर तातडीने तपास करून त्या प्रकरणातील इतर आरोपींना पकडले होते. मात्र, दाभाडे आणि शिंदे त्यांच्या हाती लागले नव्हते. गेले पंचेचाळीस दिवस जाधव आणि त्यांचे पथक दाभाडेच्या मागावर होते. दाभाडेला खेड तालुक्यातील दुर्गम भागाची माहिती होती. त्यामुळे तो डोंगररांगामध्ये आश्रयास गेला होता. आंबू डोंगरावर तो तंबू ठोकून राहत होता. पैशांची त्याला कधीच चणचण भासत नव्हती. तो कायम त्याच्याकडील बॅगेत दोन ते तीन लाख रुपयांची रोकड घेऊन फिरायचा. पैसे संपल्यानंतर त्याने दूरध्वनी केल्यानंतर काही तासात त्याच्याकडे साथीदार पैसे पोहोचावयाचे. त्याच्या मागावर असलेल्या पोलिस निरीक्षक जाधव यांना खबऱ्यामार्फ त सोमवारी (२८ नोव्हेंबर) दाभाडेचा ठावठिकाणा समजला आणि जाधव तातडीने सहायक निरीक्षक राजेश रामाघरे, सतीश होडगर, विनोद घोळवे, अंकुश माने, विजय पाटील, किरण आरुटे, विशाल साळुंखे, चंद्रकांत वाघ, सचिन मोरे, कोकणी यांच्यासह तिकडे रवाना झाले. त्यांनी मध्यरात्रीपासून आंबू डोंगररांगामध्ये शोधमोहीम राबवली आणि मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांना तंबू दिसला. पोलिसांनी चारही बाजूंनी तंबूला वेढा घातला. दाभाडे आणि त्याचा साथीदार शिंदेला शरण येण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मात्र, त्यांनी पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता थेट त्यांच्याकडील पिस्तुलातून गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दाभाडे आणि िशदे जखमी झाले. त्यांना तातडीने चाकण येथील रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारापूर्वीच दोघे मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली. तपासणीत देशी बनावटीची सात पिस्तुले आणि बेचाळीस काडतुसे पोलिसांनी जप्त केली.दाभाडे आणि त्याचा साथीदार चकमकीत टिपले गेल्याचे वृत्त तळेगावमध्ये पसरल्यानंतर तेथील नागरिक तसेच औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पोलिसांनी दाभाडेच्या दहशतीला विराम दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. दाभाडे याने तळेगावमधील राष्ट्रवादीचे नेते बापू भेगडे यांच्या खुनाचा कट रचल्याचे दोन महिन्यांपूर्वी उघड झाले होते. त्या वेळी पोलिसांनी दाभाडेच्या साथीदारांना पकडून भेगडे यांच्या खुनाचा कट उधळला होता.
स्टेनगन चालवण्यात वाकबगार
श्याम दाभाडेकडे कायम शस्त्रास्त्रे असायची. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खूनप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून स्टेनगन (कार्बाइन) जप्त करण्यात आली होती. तो कायम बॅगेत लाखो रुपये घेऊन फिरायचा. आंबू डोंगरावर चकमकीत मारल्यानंतर मात्र तेथे पैसे सापडले नाहीत. बहुधा नोटाबंदीमुळे त्याला पैशांची चणचण भासत होती, असे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.