मुंबईत रेव्ह पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी किरण गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते. त्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल केला जात आहे. ही कारवाई बनावट असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता.

किरण गोसावी आणि मनिष भानुशाली यांच्याबद्दल प्रश्न विचारण्या येऊ लागल्यानंतर त्यावर एनसीबीने भाष्य केले होते. आर्यन खान ड्रग्जच्या प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवले आहे. मात्र एनसीबीचा साक्षीदार असणाऱ्या किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात कामाला लावतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर आता क्रूज ड्रग्ज जप्ती प्रकरणात एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार असलेल्या किरण गोसावी यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बुधवारी दिली. लुकआउट नोटीशीनुसार एखाद्या व्यक्तीला देश सोडण्यास मनाई केली जाते.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “आम्ही २०१८ मध्ये फरसाखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीच्या प्रकरणात फरार असलेल्या केपी गोसावीविरोधात लुकआउट सर्क्युलर नोटीस जारी केली आहे,” असे गुप्ता म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती. गोसावी याने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार आहे. त्यामुळे आता फरासखाना पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.