पुणे : खराडी परिसरातील बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना ‘डिजिटल’ अटक करण्याची भीती दाखवून फसवणूक करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधारासह ३ जण फरार आहेत. अटक केलेले आरोपी हे गुजरात, राजस्थान या राज्यातील असून बहुतांश कर्मचारी हे परराज्यांतील आहेत. फसवणूक केलेली रक्कम ही हवालामार्फत देशात येत असल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे.

खराडी- मुंढवा रस्त्यावरील प्राईड आयकॉन या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर ‘मैग्नटेल बीपीएस ॲण्ड कन्सल्टंट’ या नावाने हे कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमध्ये १२३ कर्मचारी काम करीत होते. त्यांच्याकडे दररोज सुमारे एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता. ‘तुमच्या खात्यातून अमली पदार्थ खरेदी व्यवहार झाले आहेत, तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते, अशी भीती घालून रोज सायबर फसवणुकीच्या माध्यमातून सुमारे ३० ते ४० हजार डॉलर्स (सुमारे ३२ ते ३३ लाख रुपये) अमेरिकन नागरिकांकडून उकळले जात होते. हा पैसा हवालाच्या माध्यमातून देशात येत असल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

सरजितसिंग गिरावतसिंग शेखावत ( सध्या रा. खराडी, मूळ रा. झुंझुनू, राजस्थान), अभिषेक अजयकुमार पांडे (मूळ रा. अहमदाबाद, गुजरात), श्रीमय परेश शहा (मूळ रा. अहमदाबाद), लक्ष्मण अमरसिंग शेखावत (मूळ. रा. अहमदाबाद) आणि ॲरोन अरुमन खिश्चन (मूळ रा. अहमदाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. करण शेखावत (रा. अहमदाबाद), संजय मोरे आणि केतन रवाणी हे तिघे फरार झाले आहेत. यातील करण शेखावत हा सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. अटक केलेल्यांपैकी सरजितसिंग शेखावत हा मॅनेजर म्हणून काम करायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे कॉल सेंटर असून तेथून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी तेथे १२३ लोक उपस्थित होते. त्यात १२ महिला होत्या. हे सर्वजण कर्मचारी म्हणून तेथे काम करीत होते. पहाटे सहा वाजेपर्यंत पोलिसांनी कॉल सेंटरची झडती घेतली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. तर, तीन फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

अटक आरोपी हे एकाच भागातील आहेत. त्यांची एकमेकांशी कशी ओळख झाली. तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांची नेमणूक कशी केली, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, स्वप्नाली शिंदे, शब्बीर सय्यद, प्रताप मानकर, वाहीद पठाण, उपनिरीक्षक तुषार भोसले, वैभव मगदूम, विलास चव्हाण, अविनाश इंगळे, एकनाथ जोशी, विजय पवार, नीलेश जाधव, हरिश मोरे, विशाल इथापे, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण रजपूत, सीमा सुडीत, स्मिता हंबीर, जान्हवी मडेकर आदींसह पथकाने ही कारवाई केली.

फसवणूक करण्याची पद्धत

या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांशी संपर्क करून त्यांना बँक खात्यांशी संबंधित समस्या किंवा तुमच्या खात्यातून ड्रग्सचे व्यवहार झाले असून तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती घालून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करायचे. त्यानंतर यांपासून बचावासाठी क्रिप्टो करन्सी किंवा गिफ्ट व्हाउचर्सच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. हे पैसे इंटरनॅशनल हवालाच्या माध्यमातून देशात आणण्यात येत होते. त्यांची महिन्याला ७ ते ८ कोटींची उलाढाल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी सांगितले.

६४ लॅपटॉप, ४१ मोबाइल जप्त

या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी ६ ते रात्री २ पर्यंत काम चालायचे. येथून पोलिसांनी ६४ लॅपटॉप, ४१ मोबाइल, ४ राऊटर जप्त केले आहेत. कर्मचाऱ्यांना रोज फोन करण्यासाठी दिली जाणारी एक लाख जणांची यादी नेमकी कुठून आणि कशी येत होती, फसवणुकीनंतर मिळणारे पैसे देशात कसे येत होते, याबाबत गुुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.

कारवाईची भीती दाखवून अमेरिकन नागरिकांची सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी अमेरिकेतील नागरिकांचा डेटा कसा मिळवित होते, त्यामध्ये आणखी कोण सामील आहे का, याबाबत तपास करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त