पुणे : पुणे रेल्वे स्थानक, येरवडा आणि भोसरी परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन बुधवारी सकाळी पोलिसांना आला. स्थानिक पोलिसांसह रेल्वे सुरक्षा दलातील यंत्रणांनी कसून तपासणी केल्यानंतर अखेर ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. येरवडा आणि भोसरी परिसरातही पोलिसांनी तपासणी केली. मात्र, तेथेही बॉम्ब ठेवल्याची अफवाच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन राज्य पोलिसांच्या कक्षात येताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. संरक्षण दल, स्थानिक लोहमार्ग पोलीस, बॉम्ब शोधपथक, बंडगार्डन पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि श्वान पथकाने परिसरात तपासणी केली. पुणे स्थानकातून दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे, तसेच बाहेरून येणाऱ्या प्रत्येक रेल्वेमध्ये तपासणी करण्यात आली.
अफवेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात आली. कसून तपासणीनंतर ही अफवा असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात आहे.
धमकीचा फोन आल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. प्रतिबंधात्मक सुरक्षा योजना म्हणून रेल्वे स्थानकात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. – प्रियंका शर्मा, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, पुणे विभाग