पुणे : ‘मुख्यमंत्री महोदय, चंद्रकांतदादांना आमचे पुणेकर अजून कोल्हापूरचेच समजतात. ही काय अडचण आहे? तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, मग इथेच लक्ष का घालत नाही,’ अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारली आणि पुण्याच्या ‘दादां’वरून सभागृहात चौफेर राजकीय टोलेबाजी झाली. ‘तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊ दिले नाही,’ अशी टिप्पणी फडणवीस यांनी लगावताच, ‘तुमच्याबरोबर यायचे ठरले तेव्हा पुण्याचा पालकमंत्री करतो, हे कबूल केल्याने तुमच्याबरोबर आलो,’ असे अजित पवार म्हणाले आणि व्यासपीठावर हस्याचे फवारे उडाले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला. ‘दिल्लीत असताना गडकरी सर्वांना आपले वाटतात. शरद पवार साहेब असतानाही ते दिल्लीत सर्वांना जवळचे होते. नाश्ता किंवा जेवण्याच्या वेळी गेले, तर ते आलेल्यांना आग्रहाने खाऊ घालतात. ते पुणेकर नाहीत,’ असे सांगतानाच अजित पवार यांनी निवेदिकेने केलेल्या दोन दादांचा उल्लेख केला.

‘व्यासपीठावर दोन दादा आहेत, हा निवेदिकेचा धागा पकडून निवेदिकाही पुण्याच्या आहेत का हो,’ असा मिश्लिक सवाल करून, ‘तिसरे दादा म्हणजे चंद्रकांतदादा व्यासपीठावर असूनही आमचे पुणेकर त्यांना अजूनही कोल्हापूरकर समजतात. ही काय अडचण आहे,’ अशी विचारणा पवार यांनी केली.

हाच धागा पकडून दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही, ‘तिसऱ्या दादांच्या मनात काही बरोबर दिसत नाही. पण, तसे काही होणार नाही,’ असे सांगताच व्यासपीठावरूनच ‘आपल्या हातात काय आहे? देवेंद्रजींच्या हातात सर्व काही आहे,’ अशी टिप्पणी पवार यांनी केली. या दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही भाषणातून पवार यांना चिमटा काढला. ‘पुण्याचे दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत,’ असा उल्लेख केला. तेव्हा पवार यांनी, ‘आणखी कोण दादागिरी करते का,’ असा सवाल केला. त्यावर, ‘काही लोक दादागिरी करत नाहीत. मात्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच ती असते,’ असा चिमटा काढल्याने सहभागृहात हस्यकल्लोळ उडाला.

सुरत, गुवाहटीचे रस्तेही गडकरींनी केले

‘नितीन गडकरी यांनी देशात सर्वत्र चांगले रस्ते केले आहेत. सुरत, गुवाहटीचे रस्तेही त्यांनीच केले,’ असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर, ‘त्यामुळेच तुमची सोय झाली. लवकर पोहोचलात. तुमच्या मागे पोलिसही पाठविले, पण त्यांनाही तुम्हाला गाठता आले नाही,’ अशी मिश्लिक टिप्पणी अजित पवार यांनी केली.