पुणे : पुण्यातील वाढत्या शहरीकरणाबरोबरच हवेची गुणवत्ताही खालावत चालली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणारी बांधकामे आणि औद्योगिक कचऱ्यामुळे होणारे वायू प्रदूषण यामुळे खराब हवेचे दिवस वाढल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून नुकतीच समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रदूषणाचा फुफ्फुसांवर होत असलेल्या गंभीर परिणामांबाबत आरोग्यतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.
प्रदूषणामुळे दमा, गंभीर श्वसनविकार (सीओपीडी), फुफ्फुसांचा कर्करोग यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. दीर्घकाळपर्यंत प्रदूषित हवेच्या संपर्कात राहिल्यास फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊ लागते. प्रदूषणकारी पीएम २.५ हे सूक्ष्म कण हे २.५ मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी आकाराचे असतात. मानवी केसाच्या तुलनेत हे कण सुमारे ३० पट लहान असून, हवेत सहज मिसळतात आणि श्वसनमार्गाने फुफ्फुसांत प्रवेश करतात. हे कण मुख्यतः वाहतुकीमधून निर्माण होणाऱ्या धुरातून, औद्योगिक प्रक्रियांमधून, बांधकामाच्या धुळीमधून आणि कचऱ्याच्या जाळण्यातून होणाऱ्या धुरातून हवेत मिसळतात.
याविषयी फिजिशियन डॉ. गीतांजली पाटील म्हणाल्या की, हवेतील सूक्ष्म कण, नायट्रोजन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड हे फुफ्फुसांमध्ये जातात. यामुळे श्वसनमार्गात जळजळ होते, खोकला येतो, घसा खवखवतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. आधीपासून दम्याचा विकार असलेल्या रुग्णांना प्रदूषित हवेमुळे जास्त त्रास होतो. दीर्घकाळ प्रदूषित हवेत राहिल्यास फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. लहान मुलांची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात. त्यामुळे प्रदूषणाचा त्यांच्यावर जास्त परिणाम होतो.
याबाबत कर्करोगतज्ज्ञ डॉ. चैत्रा देशपांडे म्हणाल्या की, हवा प्रदूषणाचा फुप्फुसांवर होणारा परिणाम दर्शविणारे अनेक लक्षणे दिसतात. त्यापैकी एक मुख्य लक्षण म्हणजे सतत खोकला येणे. तुम्हाला खोकल्याचा होणारा त्रास हे छातीत झालेल्या संसर्गाचे निदर्शक आहे. फुफ्फुसे हवा शरीरात शोषून घेण्याचे कार्य करतात. मात्र, वाढत्या प्रदूषणामुळे त्यात अडथळा निर्माण होतो. त्यात काही धूलिकण अडकतात आणि संसर्ग होतो. यामुळे फुफ्फुसाची काम करण्याची क्षमता कमी होते. दीर्घकाळ प्रदूषित हवेत राहिल्यास फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका निर्माण होतो.
काळजी काय घ्यावी…
- घरातून बाहेर पडण्यापूर्वी हवेची गुणवत्ता तपासा.
- प्रदूषण जास्त असलेल्या क्षेत्रात फिरणे टाळा.
- प्रदूषणाची पातळी जास्त असताना घराबाहेर पडणे टाळा.
- बाहेर जाणे टाळता येत नसल्यास मास्कचा वापर करा.
- घरात हवा शुद्धिकरण उपकरणे बसवा.
- धूम्रपान फुफ्फुसांना हानिकारक असल्याने ते टाळा.
- हवेची गुणवत्ता खराब असताना बाहेर व्यायाम करणे टाळा.