Pune Porche Accident: पुण्यात गेल्या वर्षी १९ मे रोजी पहाटे झालेल्या पोर्शे टायकन कार अपघातातील १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करणारा पुणे पोलिसांचा अर्ज पुणे बाल न्याय मंडळाने मंगळवारी फेटाळून लावला.
बाल न्याय मंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत, असे निरीक्षण नोंदवले की, अल्पवयीन मुलावर झालेला गुन्हा बाल न्याय कायद्याच्या अर्थानुसार घृणास्पद गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला की, बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीच्या बाजूने आदेश दिला असून, अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी फेटाळली आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, अल्पवयीन आरोपीने ‘घृणास्पद गुन्हा’ केला आहे. संभाव्य परिणाम माहिती असूनही तो मद्यपान करून पोर्शे कार चालवत होता.
बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलिसांच्या या मागणीला विरोध केला व म्हटले की, सध्याचा गुन्हा कायदेशीरदृष्ट्या ‘घृणास्पद’ म्हणता येणार नाही आणि कायद्याचा उद्देश ‘सुधारणात्मक’ आहे, ‘दंडात्मक’ नाही.
दरम्यान, पोलिसांनी १९ मे २०२४ रोजी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले होते. त्यावेळी त्याला “रस्ते अपघातांची कारणे आणि त्यावर उपाय” या विषयावर ३०० शब्दांचा निबंध लिहिणे, आरटीओ अधिकाऱ्यांना मदत करणे आणि १५ दिवस वाहतूक नियमांचा अभ्यास करणे या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी या निर्णयावर देशभरातून टीका झाली होती.
या टीकेनंतर , २२ मे २०२४ रोजी अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात पाठवण्यात आले होते. पोलिसांनी २१ मे आणि २२ मे रोजी आल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालावा यासाठी बाल न्याय मंडळाकडे अर्ज सादर केले होते.
त्यानंतर अल्पवयीन मुलाच्या आत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्याची सुटका करण्याची मागणी केली. २५ जून रोजी उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलाला सोडण्याचे आणि त्याच्या आत्याच्या देखरेखीखाली सोपवण्याचे आदेश दिले. त्यानंतर, अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहातून सोडण्यात आले होते.
काय आहे प्रकरण?
१९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्श या लक्झरी कारने दुचाकी स्वारांना धडक दिली, त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातावेळी हा अल्पवयीन तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. त्यानंतर आरोपीला अटक झाली होती. परंतु फक्त १५ तासात त्याला जमीन मंजूर करण्यात आला होता. आरोपी निव्वळ अल्पवयीन असल्याच्या कारणास्तव ३०० शब्दांचा निबंध लिहून जामीन कसा काय दिला जाऊ शकतो, यावरून देशभरातून टीका झाली होती.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीत अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मध्यप्रदेशमधील रहिवासी होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले अनिश आणि अश्विनी पुण्यात नोकरी करत होते.