पुणे : चऱ्होली परिसराचे वाढते विस्तारीकरण लक्षात घेऊन या भागासाठी नवीन उपडाकघर सुरू करण्याचा निर्णय टपाल कार्यालयाने घेतला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी (८ मार्च) हे नवीन उपकार्यालय कार्यरत होत आहे. त्यामुळे चऱ्होली परिसराला आता ४११०८१ हा नवीन पिनकोड मिळाला आहे.

चऱ्होली परिसरातील पत्रव्यवहाराचे काम आतापर्यंत आळंदी देवाची टपाल कार्यालय येथे सुरू होते. त्यामुळे पत्रव्यहारामध्ये आळंदी प्रमाणेच चऱ्होलीसाठी देखील ४१२१०५ हा पिनकोड वापरला जात असे. मात्र, या भागातील वाढत्या वसाहती आणि कामाचा व्याप लक्षात घेऊन उपडाकघराला परवानगी मिळाली आहे, असे पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर बाळकृष्ण एरंडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी होत असलेल्या उपडाकघराच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे, पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये, पुणे क्षेत्राच्या निदेशक सिमरन कौर उपस्थित राहणार आहेत. या वेळी टपाल खात्यातील विविध श्रेणीमधील महिलांचा सत्कार आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना, मासिक प्राप्ती योजना, आवर्ती ठेव योजना, मुदत ठेव खाते अशा विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे एरंडे यांनी सांगितले.