पुणे : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या कार्यावरील विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन पुणे टपाल विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. वाई येथील प्राज्ञ पाठशाळा येथे झालेल्या कार्यक्रमास संस्कृततज्ज्ञ आणि संस्थेच्या अध्यक्ष डा. सरोजा भाटे, सचिव अनिल जोशी,सहसचिव भालचंद्र मोने ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने या वेळी उपस्थित होते.

जायभाये म्हणाले, ‘संस्कृत पंडित आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव केवळ एक विद्वान म्हणून नव्हे, तर एक मार्गदर्शक, साहित्यिक, तत्त्वज्ञ, विचारवंत आणि समाजसुधारक म्हणून आदराने घेतले जाते. सामाजिक समतेचा आग्रह धरून क्रांतिकारी बदल घडवण्याचे ध्येय ठेवणाऱ्या जोशी यांनी ज्ञानाची खऱ्या अर्थाने उपासना ही समाजाच्या उन्नतीसाठी असते हे दाखवून दिले आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक समता, वैचारिकता, आणि समाजहिताची झलक दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय टपाल विभागाच्या सेवांच्या संदर्भात माहिती देताना जायभाये म्हणाले, ‘भारतीय टपाल विभाग ज्ञानाचा आणि संवादाचा प्रसार सातत्याने करत असतो.  पत्र, मनिऑर्डर, बँकिंग, विमा, आणि आता डिजिटल सेवा अशा सर्व माध्यमातून टपाल विभाग समाजासाठी एक विश्वासार्ह दुवा बनला आहे. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, अगदी दुर्गम भागांपर्यंत टपाल विभाग पोहोचतो. सेवा आणि माणुसकी महत्वाची असते अशा एका मजबूत धाग्यात जोडून ठेवते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांचा पाया भारतीय तत्त्वज्ञान होता, तसाच टपाल विभागाचाही पाया ‘डाक सेवा, जन सेवा’ या तत्वावर आधारित आहे.’ हे विशेष टपाल आवरण संग्रही ठेऊन प्रगल्भ ज्ञानाचा वसा जतन करावा.’