पुणे : येरवडा कारागृहातील बराकीत झोपण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोन कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजय भिकाजी कापडे (वय ५२) असे शिक्षा झालेल्या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी कैदी भरत विशाल राठोड, मोहम्मद गुलाब शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत राठोड आणि मोहम्मद शेख हे येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. मारहाण झालेलेे कैदी संजय कापडे यांना शिक्षा झालेली आहे. रविवारी (७ सप्टेंबर) रात्री सव्वाआठच्या सुमारास येरवडा कारागृहातील बराकीत झोपण्याच्या कारणावरुन कापडे, राठोड, शेख यांच्यात वाद झाला. वादातून त्यांच्यात बाचाबाची झाली. राठोड आणि शेख यांनी खिळ्याने कापडे यांना मारहाण केला, तसेच त्यांच्या छातीत ठोसे मारले. कैद्यांमध्ये सुरू असलेली हाणामारीच्या घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी मध्यस्थी केली. कापडे यांना दुखापत झाल्याने त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी कारागृहास भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत. यापूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. तसेच कैद्यांकडे मोबाइल संच सापडले होते. कारागृहातून कैदी पसार होणे, मोबाइल सापडणे, तसेच हाणामारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.