“उघड दार उद्धवा आता…”; भाजपापाठोपाठ मनसेचे मंदिरांसाठी आंदोलन

राज ठाकरेंच्या घोषणेनंतर आंदोलनाला सुरुवात; पुण्यातल्या तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर आंदोलन

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या ‘शंखनादा’नंतर घंटानाद आंदोलन सुरू करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. त्याप्रमाणे आता पुण्यात आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केलं.

‘जनआशीर्वाद यात्रा, मेळावे, परस्परांविरोधात आंदोलने होत आहेत. परंतु सण आला की करोनाचे कारण देत निर्बंध कठोर केले जातात. ‘लॉकडाऊन आवडे सर्वाना’ अशी राज्य सरकारची परिस्थिती आहे,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सरकारला लक्ष्य केले. ‘नियम सर्वाना सारखे असले पाहिजे. एकाला एक नियम तर दुसऱ्याला दुसरा, हे बरोबर नाही. शिवसेना विरोधात असती तर त्यांनी काय केले असते, असा सवाल ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला होता.

हेही वाचा – पुढच्या आठ दिवसांत मंदिरं खुली करा; राज्यभरात विविध ठिकाणी भाजपा आक्रमक

राज ठाकरे राज्यतील सण-उत्सवांवरील बंदी आणि मंदिरं उघडण्यावरील निर्बंधांवर बोलताना म्हणाले होते की, नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. बाकीच्या सगळ्यांचे मेळावे सुरु आहेत. भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीडंही साजरी करायची नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का? जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाउन नाही. सण आला की लॉकडाउन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते.”

आणखी वाचा -पुढच्या आठ दिवसांत मंदिरं खुली करा; राज्यभरात विविध ठिकाणी भाजपा आक्रमक

करोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune protest by mns for opening of temple in state raj thackeray vsk 98 svk

ताज्या बातम्या