पुणे : हवामान विभागाने १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत पुणे जिल्ह्यातील घाट भागासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यानुसार घाट भागाला पावसाने झोडपून काढले आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत ताम्हिणी येथे ३२०, लोणावळा येथे १८९, तर मुळशी येथे ८० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.
बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील स्थितीमुळे राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. त्यात उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशातील दाब क्षेत्र, तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती (ऑफशोअर ट्रफ) निर्माण झाली आहे. तसेच विदर्भाजवळही कमी दाबाचे क्षेत्र आहे. एकाच वेळी तीन प्रणाली सक्रिय झाल्यामुळे पर्जन्यवृष्टी जोरदार होत आहे. हवामान विभागाने तीन दिवसांसाठी पुण्याच्या घाट परिसरासह काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे. त्यानुसार घाट परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या मोसमात ताम्हिणी येथे आतापर्यंत ६ हजार ५८२, लोणावळा येथे ३ हजार ७३७, मुळशी येथे २९०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे त्यात आणखी वाढ होणार आहे.
घाट परिसराला पावसाने झोडपून काढतानाच शहरातही संततधार सुरू आहे. गेल्या २४ तासांत पुणे शहरात ३५ मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तर लवळे येथे ४६.५, पाषाण येथे ४३, चिंचवड येथे ३९.५, तळेगाव येथे ३४, हडपसर आणि मगरपट्टा येथे २०.५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पुणे शहरात अधून-मधून जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे, तर घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. बुधवार दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.