पुण्यातील पावसाने अकरा जणांचे प्राण हिरावून घेतले. या अकरा जणांच्या पाठीमागे असलेल्या कुटुंबावर मात्र दु्ःखाने आघात केला आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसात बांधकाम व्यावसायिक असलेले किशोर गिरमे यांचाही मृत्यू झाला. कारमधून घरी जाण्यासाठी गिरमे निघाले. पण पोहोचलेच नाही. धायरी ब्रीज खाली ट्राफिकमध्ये अडकलेल्या गिरमे हे अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात कारसह वाहून गेले. गुरूवारी सकाळी त्यांची कार दिसली पण, तोपर्यंत त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.

बुधवारी सायंकाळी पाऊस सुरू असताना धायरी ब्रीज येथे साडेदहा वाजता किशोर गिरमे हे नांदेड सिटी येथील घरी निघाले होते. पण, पाण्याचा प्रवाहात चारचाकी गाडीसह वाहून गेले आणि या घटनेत गाडीत अडकून त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेपूर्वी काही मिनिटं अगोदर किशोर यांचं मुलगा कौशलसोबत फोनवर बोलणे झालं होतं. कौशलच बाबासोबत शेवटचं संभाषण ठरलं. कौशल म्हणाला “मी बाबांना मी 10 वाजण्याच्या सुमारास फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितले बराच वेळ झालाय, ट्राफिकमध्ये अडकून पडलो आहे. 15 मिनिटांमध्ये घरी पोहोचतो,” असं बाबा म्हणाल्याचे कौशल म्हणाला. “त्यानंतर बराच वेळ झाला, तरी बाबा घरी न आल्याने पुन्हा फोन केला. पण समोरून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही बाबाचा शोध घेण्यास सुरुवात केली. जवळपास 6 तास शोध घेतल्यानंतर बाबांची कार पासलकर ब्रीजच्या खालच्या बाजूच्या पाण्यात दिसली. तिथे जाऊन पाहतो, तर सीट बेल्ट लावलेल्या अवस्थेत बाबांचा मृतदेह दिसला,” असं कौशल म्हणाला.

पुण्यात बुधवारी पावसामुळे मोठी जीवितहानी झाली. अरण्येश्वर येथील टांगावाले कॉलनी परिसरात पावसामुळे भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात अकरा जण मरण पावले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.