सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या आणि नंतर काय घाण करायची ती करा अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना खडसावल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांना लिहिलेल्या पत्राचा रोख हा वसंत मोरेंच्या दिशेने असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात आहे. वसंत मोरे आणि राज ठाकरेंमधील नाराजी नाट्य मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. त्यातच आता राज यांनी पोस्ट केल्याच्या दुसऱ्याच दिवशी वसंत मोरेंनी केलेल्या या पोस्टमधून नेमकं त्यांना काय सूचित करायचं आहे याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.

राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिलं–

“सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही,” असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे. पुढे ते म्हणालेत की “माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्याशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या. मग त्यानंतर काय घाण करायची असेल ती करा.”

“पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे याची नोंद घ्या असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वसंत मोरे काय म्हणाले?

राज ठाकरेंनी बुधवारी हे पत्र पोस्ट केल्यानंतर गुरुवारी वसंत मोरेंनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये एक व्हिडीओ दिसत आहे. हा व्हिडीओ एखाद्या फार्महाऊसवर चित्रित करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र या व्हिडीओपेक्षा त्याची कॅप्शन अधिक लक्ष वेधून घेणारी आहे.

नक्की वाचा >> “उपमुख्यमंत्र्यांची बायको डोक्यात थोडी कमी आहे का?” रुपाली ठोंबरे संतापून म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीसांनी अमृता मामीला ठणकावून…”

“राजकारणाचं काय खरं नाही, निवडणुका ही लोक कधी घेतील माहिती नाय बाबा… जरा उद्योग व्यावसायाकडे लक्ष केंद्रित करतो,” असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे. सदर फार्महाऊस लग्न, पार्टी, स्वागतसमारंभ, वाढदिवस यांसाठी उपलब्ध असल्याचं वसंत मोरेंनी म्हटलं असून हे फार्महाऊस कृष्ण लीला गढी नावाचं असून ते पुरंदरमधील भिवरी येथे असल्याचं पोस्टमधून नमूद करण्यात आलं आहे. या पोस्टमधील पहिल्या दोन वाक्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळेच वसंत मोरेंनी, “राजकारणाच काय खरे नाही,” असं म्हटलं आहे. तसेच या निवडणुकींबद्दलचा संभ्रम कायम असल्याने, “निवडणुका ही लोक कधी घेतील माहिती नाय बाबा… जरा उद्योग व्यावसायाकडे लक्ष केंद्रित करतो,” असंही त्यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “बिल क्लिंटनही विचारतात Who is Eknath Shinde? केवढं काम करतो! कधी झोपतो? कधी…”; CM शिंदेंचा पत्रकारांसमोर दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील राज ठाकरेंच्या भूमिकाला वसंत मोरेंनी विरोध केल्याने ते चर्चेत आले होते. त्यानंतर अनेक आठवड्यांनी आपले पक्षाच्या भूमिकेशी दुमत नसल्याचं वसंत मोरेंनी म्हटलं होतं. वसंत मोरेंनी अनेकदा राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता काही आठवड्यांपासून वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. त्याच त्यांची केलेलं हे विधान सध्या चर्चेत आहे.