पिंपरी : राष्ट्रीयकृत बँकेतून निवृत्त झालेल्या नागरिकाला गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख ७० हजारांची फसवणूक केली. ही घटना पिंपळे निलख येथे घडली.याबाबत ६४ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध मोबाइल धारक महिला आणि बँक खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका राष्ट्रीयकृत बँकेतून निवृत्त झाले आहेत.
दोन जुलै रोजी त्यांना दोन महिलांनी संपर्क साधला. तसेच समाजमाध्यमातील समूहात समाविष्ट करून घेतले. ‘उच्च परतावा’ मिळेल असे सांगत विविध मोबाइल क्रमांक आणि अॅप्सद्वारे फिर्यादीला २१ लाख ७० हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. बनावट ट्रेडिंग लिंक्सवरून व्यवहार करण्यास उद्युक्त करत संशयितांनी अनेक खात्यांत पैसे वर्ग करायला लावले. गुंतवणूक वाढल्याचा भास निर्माण करून रक्कम अडकल्याची माहिती त्यांनी दिली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
दुकानदारावर कुऱ्हाडीने हल्ला
‘कामाचे पैसे द्या’, असे म्हणत दुकानात काम करणाऱ्या नोकराने मालकावर कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना पिंपळे सौदागर येथील एका दुकानात घडली.याबाबत केशकर्तनालय मालकाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालक दुकानात काम करत असताना, तेथील कामगाराने पगाराचा हिशोब मागत वाद घातला. ‘हिशोब कर, पैसे दे नाहीतर तुला सोडणार नाही’ असे धमकावत आरोपीने दुकानातील लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यात वार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले, घटनेनंतर आरोपी हा पळून गेला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
भरधाव वेगातील बसने धडक दिल्यामुळे पायी चाललेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना मोशीतील भारतमाता चौकात घडली. ज्ञानदेव गणपत निकम (७८, खताळवस्ती, शिवाजीवाडी, मोशी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा संजय ज्ञानदेव निकम (४९, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय यांचे वडील ज्ञानदेव निकम हे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या बसने ज्ञानदेव यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानदेव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
रिक्षाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला भरधाव वेगातील रिक्षाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. शांताबाई रोहिदास कांबळे (५४) असे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गणेश रोहिदास कांबळे (१९, सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी शनिवारी (१५ नोव्हेंबर) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई शांताबाई या पिंपळे गुरवमधील बॅक ऑफ महाराष्ट्रजवळ रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शांताबाई या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
चिखलीत गांजासह तरुणास अटक
अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत २५४ ग्रॅम गांजा आणि दुचाकीसह एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (१५ नोव्हेंबर) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास जाधववाडी रोड, चिखली येथील एका हॉटेलच्या वाहनतळामध्ये करण्यात आली.
पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष गोकुळदास तांबे (४५, वेताळनगर, चिंचवड) याला अटक केली आहे. एका विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुूसार, आरोपी संतोष तांबे हा गांजा घेऊन फिरत असताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५४ ग्रॅम वजनाचा गांजा, एक दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण एक लाख २२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास सुरू आहे. आरोपी संतोष तांबे याने हा गांजा गुन्हा दाखल केलेल्या आरोपीकडून विक्रीसाठी आणला होता. चिखली पोलीस तपास करत आहेत.
