पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महापालिकेच्या पथ विभागाने दुरुस्त केलेले खड्डे पुन्हा दिसू लागले आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली असून, त्यामधून वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून राहत असल्याने खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या पथ विभागाने यापूर्वी दुरुस्त केलेल्या खड्ड्यांमधील खडी बाहेर येत असून रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठत असल्याने किरकोळ अपघात देखील घडत आहेत.

महापालिकेने काही दिवसांपूर्वी शहरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी सांडपाणी वाहिनी तसेच ड्रेनेज लाईनची कामे करण्यासाठी अनेक भागातील रस्ते खोदले होते. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची डागडुजी करताना योग्य पद्धतीने करण्यात न आल्याने सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या पथ विभागाने केलेली रस्त्यांची अवस्थाही बिकट झाली असून, त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे लक्षात येताच तेथे महापालिकेच्या वतीने डागडुजी करुन खड्डे बुजविले जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. पावसात खड्डे दुरुस्ती करताना काही अडचणी येत असल्या, तरी रस्त्यांवर पडलेले खड्डे कमीत कमी वेळेत कसे दुरुस्त करता येतील, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), कात्रज-कोंढवा रस्ता, राजस सोसायटी चौक, माणिकबाग चौक, पुणे स्टेशन पसिसर, आरटीओ कार्यालय ते वाडिया महाविद्यालय, यासह शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळातील रस्त्यांवर देखील खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. उपनगरांसह महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

खड्ड्यांच्या ३७० पैकी ३०४ तक्रारी सोडविल्या

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार नागरिकांना महापालिकेकडे करता यावी, यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने ‘पीएमसी रोड मित्र’ ॲप सुरू केले आहे. या ॲपवर गेल्या सहा दिवसांमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या ३७० तक्रारी आल्या आहेत. यामध्ये खड्डांच्या सर्वाधिक तक्रारी झोन क्रमांक ५ मध्ये ८५ इतक्या आहेत. महापालिकेकडे आलेल्या खड्डयांच्या ३७० पैकी ३०४ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. उर्वरित ६६ तक्रारींवर काम सुरू असल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.