पुणे : अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एका ज्येष्ठाने याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६९ वर्षीय ज्येष्ठ आणि त्यांची पत्नी वारजे भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ९ ऑगस्ट रोजी संपर्क साधला. ‘डाटा फायनान्स ऑफ इंडिया’ या संस्थेतून बोलत असल्याची बतावणी चाेरट्यांनी त्यांच्याकडे केली.

काळ्या पैशांच्या व्यवहारात कारवाई करण्यात येणार असून, या प्रकरणात अटक करण्यात येईल, अशी भीती दाखवून चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे पाठविण्यास सांगितले. चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यांत त्यांनी चार दिवसांत २४ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना आणखी रक्कम पाठविण्यास सांगितले. दाम्पत्याला संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. चौकशीत फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एका ज्येष्ठ महिलेची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बिबवेवाडीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने दहा लाख रुपये जमा केले. सुरुवातीला महिलेला चोरट्यांनी परतावा दिला. त्यानंतर परतावा, तसेच मूळ रक्कम दिली नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बेंद्रे तपास करत आहेत.

सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ

शहरात सायबर चोरट्यांकडून फसवणूक होण्याच्या घटनांत मोठी वाढ होत आहे. यामध्ये तंत्रज्ञानाची माहिती असलेले उच्चशिक्षितही जाळ्यात फसत असल्याने या घटना चिंता वाढविणाऱ्या ठरत आहेत. गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष, अमली पदार्थ सापडल्याची, गैरव्यवहार केल्याची बतावणी करून अटकेची भीती अशा वेगवेगळ्या मार्गांनी सायबर चोर फसवणूक करतात. नागरिकांनी याबाबत सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.