पुणे : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलावर झालेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर वडगाव उड्डाणपूल चौकातील सिग्नलच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. वडगाव उड्डाणपूल चौकातून धायरीकडे जाणाऱ्या सिग्नलच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृहादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन एक मे रोजी करण्यात आले होते. उड्डाणपुलावरून उतरणारी वाहने वडगाव उड्डाणपूल चौकातून धायरीकडे जातात. वडगाव चौकातील सिग्नलची वेळ पूर्वी ७० सेकंद होती. वेळ कमी मिळत असल्याने वाहनचालकांना चौक ओलांडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे उड्डाणपुलावर कोंडी हाेत असल्याचे निदर्शनास आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या भागाची नुकतीच पाहणी केली. त्यानंतर वडगाव उड्डाणपूल चौकातील सिग्नलच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वडगाव उड्डाणपूल चौकातून धायरीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आता १०० सेकंद देण्यात आले आहेत. सिग्नलच्या वेळेत वाढ करण्यात आल्याने या भागातील वाहतूक सुरळीत झाली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धायरीकडून स्वारगेटकडे जाताना एक मार्गिका खुली (फ्री लेन) ठेवण्यात आली आहे. तेथील पदपथ काढून टाकण्यात आला आहे. स्वारगेटकडे जाताना एक गतिरोधक होता. हा गतिरोधक काढून टाकण्यात आला आहे. तेथील वाहतूकविषयक सुधारणेची कामे हाती घेण्यात आली आहे. धायरीहून स्वारगेटकडे जाणाऱ्या मार्गावरील अडथळे काढून टाकण्यात आले आहे. या भागातील बेवारस वाहने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.