पुणे : पुणे ते सिंगापूर (एआय-२१११-१०) ही विमानसेवा पुढील अडीच महिने (३० सप्टेंबरपर्यंत) बंद ठेवण्याचा निर्णय ‘एअर इंडिया’ या विमान कंपनीने घेतला आहे. मंगळवारी ‘एअर इंडिया’ने अधिकृत पत्रकाद्वारे माहिती दिली.
अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर ‘एअर इंडिया’च्या ताफ्यातील विमानांच्या तक्रारी समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) ‘एअर इंडिया’च्या विमानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २४ जूनपासून १५ जुलैपर्यंत या कंपनीच्या विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली होती. मात्र, अद्याप सुरक्षितता आणि तांत्रिक दुरुस्ती सुरू असल्याने ३० सप्टेंबर पर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आठवड्याला पाच विमानांची पुणे-दिल्ली-सिंगापूर अशी नियोजित उड्डाणे होती. परिणामी, पुणे ते सिंगापूर या विमानांची सेवा अडीच महिने रद्द केल्याने याचा फटका पुणे-दिल्ली विमान सेवेलाही बसणार आहे.
‘एअर इंडिया’च्या निवेदनानुसार, ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशांशी थेट संपर्क साधून पुन्हा आरक्षण किंवा परतावा पुन्हा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर ऑगस्टपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या टप्प्याटप्प्याने १ ऑक्टोबरपासून संपूर्ण वेळापत्रक पूर्ववत करण्याचे उद्दिष्ट आहे.
पुणे ते सिंगापूर ही विमानसेवा व्यवसाय व कौटुंबिक प्रवासासाठी अतिशय उपयुक्त होती. माझ्या त्रैमासिक भेटी या विमानसेवेभोवती केंद्रित होत्या. या मार्गावरील विमानांची उड्डाणे रद्द केल्याने वाढल्याने नाराजी झाली असली, तरी सुरक्षेचा विचार महत्त्वाचा आहे. ही सेवा आणखी विलंब न लावता लवकर सुरू व्हावी. – रंजीत चड्डा, उद्योजक.