पुणे : वैमनस्यातून टोळक्याने दहशत माजवून गाड्यांची तोडफोड केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात घडली. टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी साई पांडुरंग उमाप (वय १८, रा. समर्थनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमाप आणि तरुणाचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रारदार तरुण वडगाव बुद्रुकमधील तुकाईनगर भागात थांबला होता. त्या वेळी उमाप आणि त्याच्याबरोबर असलेले दोन साथीदार तेथे आले. त्यांनी तरुणाला शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार केले, तसेच परिसरातील दुचाकींची तोडफोड करून दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास करत आहेत.
शहरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचे सत्र कायम आहे. आठवड्यापूर्वी बिबवेवाडीतील पद्मावतीनगर भागात टोळक्याने दहशत माजवून १० ते १५ वाहनांची तोडफोड केली होती.