पुणे : सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून साडेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरी प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. सोसायटीतील रखवालदाराने साडेआठ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याचे तपासात उघडकीस आले असून, या प्रकरणी रखवालदाराला अटक करण्यात आली.
राकेशकुमार मूलचंद सोनी (वय २९, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या रखवालदाराचे नाव आहे. सोनी हा सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा परिसरात रखवालदार म्हणून काम करतो. ८ ऑगस्ट रोजी तक्रारदार हे बाहेरगावी गेले होते. सोसायटीतील रखवालदार सोनी याने तक्रारदाराच्या सदनिकेचे कुलूप तोडून आठ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले होते. १२ ऑगस्ट रोजी ते गावाहून परतले. तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तक्रारदाराने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चोरट्याने शयनगृहातील कपाटातून दहा तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. सोसायटीत घरकाम करणारे, रहिवाशी, तसेच रखवालदाराची चौकशी करण्यात आली. तपासाता मिळालेल्या माहितीनुसार, रखवालदार सोनी याला संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सदनिकेतून ऐवज चोरल्याची कबुली दिली. सोनी याच्याकडून आठ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, अमोल दबडे, महेश मंडलिक, अमित चिव्हे, सूर्या जाधव, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, नानासाहेब खाडे, राकेश सुर्वे यांनी ही कामगिरी केली.
शहरातील अनेक सोसायटीत रखवालदार आहेत. रखवालदारांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांचे नाव, पत्ते घ्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय रखवालदारांना कामावर ठेऊ नये, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. अनेक सोसायटीतील पदाधिकारी पोलिसंच्या सूचनांकडे काणाडोळा करतात. सोसायटीतील रखवालदारांकडून घरफोडीचे गुन्हे केले जातात. रखवालदाराने हडपसर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याची घटना घडली होती. ओैंध भागातील एका बंगल्यात कामाला ठेवलेल्या रखवालदाराने लाखो रुपयांचा ऐवज लांबविला होता.