लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या ‘मी टू’च्या चळवळीने देशभरात मोठी चर्चा सुरू असतानाच सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधूनही (एससीएमसी) लैंगिक शोषणाबाबतचे प्रकार समोर आले आहेत. या महाविद्यालयांतील काही आजी आणि माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात समाजमाध्यमांमध्ये लिहिले असून, या प्रकारांबाबत तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन विमाननगर येथे आहे. या महाविद्यालयांतील १० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी, विशेषत माजी विद्यार्थिनींनी ६ ऑक्टोबरपासून समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या नावांचाही उल्लेख केला. तसेच विमाननगर कॅम्पसमध्ये विशेष ‘संस्कृती’ असल्याचेही लिहिले आहे. एका माजी विद्यार्थिनीने तिच्या इंटर्नशिपदरम्यान झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात महाविद्यालयातील इंटर्नशिप समन्वयकाकडे तक्रार केली असता, तिची इंटर्नशिप थांबवण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच लैंगिक शोषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी आपल्या पोस्टमधून केला.

समाजमाध्यमांमध्ये होत असलेल्या प्रकाराची दखल घेत सिम्बायोसिस प्रशासनाने ८ ऑक्टोबरला एससीएमसीच्या फेसबुक पेजवर ‘ओपन लेटर’ लिहून माफी मागितली. तसेच महाविद्यालयातील सध्याच्या आणि माजी विद्यार्थिनींना पुढे येऊन अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रारी नोंदवण्याचे, सुधारणेसाठी सूचना करण्याचे आवाहन करत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशांनुसार विद्यापीठात अंतर्गत तक्रार समिती आहे. या समितीद्वारे समाजमाध्यमांतील तक्रारींबाबत पुढील कारवाई करण्यात येईल.

– डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिम्बायोसिस

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune symbiosis media college in centre of metoo storm
First published on: 10-10-2018 at 10:26 IST