अल्पवयीन आरोपीने मद्यधुंद अवस्थेत महागडी पोर्श कार बेदरकारपणे चालवल्यामुळे संगणक अभियंता अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. सदर पोर्श कार अल्पवयीन आरोपीला आपल्याला आजोबांकडून वाढदिवसाची भेट म्हणून मिळाली होती. १७ वर्षीय आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी व्हॉट्सअपवर या कारचे फोटो शेअर केले होते. तसेच ही गाडी आपण नातवाला वाढदिवसाची भेट देत असल्याचे म्हटले होते. सुरेंद्र अगरवाल यांचे मित्र अमन वाधवा यांनी ही माहिती इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना दिली.

सुरेंद्र अगरवाल यांना २८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणी नगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अगरवाल यांनी धमकावून डांबून ठेवल्याची तक्रार चालक गंगाधर पुजारी यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक करण्यात आली.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी (दि. २५ मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, १७ वर्षीय अल्पवयीन आरोपी पोर्श कार चालवत असताना त्याला पुढील धोक्याची पूर्ण कल्पना होती. पोर्शची दुचाकीला धडक बसल्यामुळे अनीश आणि अश्विनीचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच अगरवाल कुटुंबियांनी सदर अपघाताचे खापर त्यांचा चालक गंगाधर याच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला.

Porsche Accident: “अल्पवयीन मुलाच्या आजोबांनी गुन्हा अंगावर घे म्हणत चालकाला..”, अमितेश कुमार यांची माहिती

“पोर्श कारच्या अपघाताची घटना घडली तेव्हा अल्पवयीन आरोपीच कार चालवत होता. त्याने ते आमच्याकडे मान्यही केले आहे. तरीही ही घटना घडली तेव्हा मुलगा मागे बसला होता आणि चालक कार चालवत होता आणि त्याच्या हातून अपघात झाला हे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चालक पोलीस स्टेशनला आला तेव्हा त्याने पहिल्या जबाबात तशीच कबुली दिली होती. मात्र अल्पवयीन मुलगाच कार चालवत होता त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तरीही चालकाने त्याचे म्हणणे सोडले नाही, चालक सातत्याने हेच सांगत होता की अल्पवयीन मुलगा कारच्या मागच्या सीटवर बसला होता. हे असे सांगण्याचं कारण म्हणजे रात्री ११ च्या सुमारास या चालकाला सोडवून घेऊन गेले होते. त्याचा मोबाइल स्वतःकडे ठेवला आणि त्याला मुलाच्या आजोबांनी डांबून ठेवलं. आम्ही सांगू त्याप्रमाणे जबाब द्यायचा, असा दबाव टाकण्यात आला होता”, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.