पुणे : ‘चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे दडपशहा आहेत. चीनने तिबेट स्वायत्त प्रदेश स्थापन केल्याच्या ६० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने त्यांनी २० ऑगस्ट रोजी तिबेटची राजधानी ‘ल्हासा’ला भेट दिली. मात्र, दलाई लामांचा उत्तराधिकारी बीजिंगकडून लादलेला नको,’ अशी भूमिका तिबेटचे संसदपटू दोर्जे त्सेतेन यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत मांडली. या वेळी तिबेटी लेखक व कार्यकर्ते तेनझिन त्सुंदूए व नॅशनल कॅम्पेन फॉर तिबेटन सपोर्टचे अध्यक्ष बाळासाहेब रास्ते उपस्थित होते.
त्सेतेन म्हणाले, ‘शी जिनपिंग यांचा तिबेट दौरा हे राजकीय नाटक असून, हा वर्धापनदिन प्रत्यक्षात चीनच्या वसाहतवादाची आठवण करून देणारा आहे. तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी त्यांच्या मृत्यूनंतरचा उत्तराधिकारी तिबेटी परंपरेनुसार निवडला जाईल, असे स्पष्ट केले आहे आणि या निवडीचा अधिकार चीनच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय गाडेन फोडरंग ट्रस्टकडे राहील. परंतु, चीनकडून त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा घाट घातला जात आहे. त्याला तिबेटचा विरोध आहे.’
गेल्या अनेक वर्षांपासून तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात हुकूमशाही वापरली जात आहे. या विरोधात कोणी बोलले, तर नागरिकांची हत्या केली जात आहे. तिबेटमध्ये एक प्रकारे अघोषित ताळेबंदी लादली गेली असून जिनपिंग यांनी वांरवार दौरे करून तिबेटबासियांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही प्रकारे जिनपिंग यांना तिबेटवर ताबा मिळवायचा आहे, असा आरोपही त्सुंदूए यांनी केला. भारतात जेवढे स्वातंत्र्य आहे, तेवढे स्वातंत्र्य तिबेटमध्ये नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे मॅक्लॉडगंजमध्ये बौद्ध धर्मातील ज्येष्ठ लामांची एक धार्मिक बैठक झाली होती. या बैठकीत दलाई लामा यांनी एका ऑनलाइन माध्यमाद्वारे संदेश प्रसारित केला होता. तसेच, दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्या वक्तव्याला चीनने आक्षेप घेतला होता. ‘तिबेटसंबंधी मुद्द्यांमध्ये भारताने हस्तक्षेप करू नये. या संदर्भात मतप्रदर्शन करताना भारताने सावधगिरी बाळगली पाहिजे. द्विपक्षीय संबंधांमध्ये परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी,’ असे चीनकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे हा वाद आणखी पेटला असून, त्या पार्श्वभूमीवर त्सेतेन यांनी ही भूमिका मांडली.