पुणे : टिळक रस्त्यावरील वेगवेगळ्या चौकात वाहतूक नियमनाची जबाबदारी सोपविण्यात आली असताना पूरम चौकात एकत्र येऊन घोळक्याने कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांंना दंडात्मक शिक्षा सुनाविण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी याबाबतचे आदेश दिले.

पोलीस हवालदार संतोष यादव, पोलीस शिपाई बालाजी पवार, मोनिका करंजकर-लांघे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. हवालदार संतोष यादव, पोलीस कर्मचारी बालाजी पवार आणि मोनिका करंजकर हे खडक वाहतूक विभागात नियुक्तीस होते. १५ मे रोजी संतोष यादव यांना स. प. महाविद्यालय चौक, बालाजी पवार यांना हिराबाग चौक आणि मोनिका करंजकर यांना भावे चौक येथे वाहतूक नियमनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

वाहतूक नियमनासाठी नेमून दिलेले चैाक सोडून तिघे जण टिळक रस्त्यावरील पूरम चौकात आले. तेथे वाहतूक नियमन न करता, वाहने थांबविताना आढळून आले होते. वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक नियमन करणे, वाहतूक कोंडी होऊ न देणे, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तिघांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यांच्याविषयी तक्रार आल्याने त्यांना वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी तिघांना निलंबित केले होते. कर्तव्यातील कसुरीबद्दल त्यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यावर त्यांनी दिलेला खुलासा अंशत: समाधानकारक आढळला. त्यामुळे त्यांच्या शिक्षेत बदल करून त्यांना दीड हजार रुपये दंडाची शिक्षा पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सुनावली.

४३ निलंबित कर्मचारी पु्न्हा सेवेत

पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनाबाबतचा आढावा नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ४३ पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. खडक वाहतूक शाखेतून निलंबित करण्यात आलेले पोलीस हवालदार यादव, पवार आणि करंजकर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची पोलीस मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.