पुणे : ‘शहरांमधील वाढती ‘वाहतूक कोंडी’ समस्या सोडविण्यासाठी ‘रस्ते रुंदीकरण’, हा पर्याय नसून, कमीतकमी वाहने रस्त्यावर कशी येतील, पादचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांसाठी जास्त पायाभूत सुविधा कशा निर्माण केल्या जातील, याचा विचार जेव्हा लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये निर्माण होईल, तेव्हा नक्कीच वाहतूक समस्या सुटेल,’ अशा सूर वाहतूक तज्ज्ञांच्या चर्चेतून शनिवारी उमटला.

‘पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि पादचारी सुरक्षा’ या विषयावर ‘सजग नागरिक मंच’तर्फे शनिवारी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’चे अध्यक्ष हर्षद अभ्यंकर, परिसर संस्थेचे अध्यक्ष रणजीत गाडगीळ, पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी पुण्यातील वाहतूक समस्या, त्याचा पादचाऱ्यांवर होणारा परिणाम आणि इतर समस्यांबाबत कोणते मार्ग अवलंबले पाहिजेत या विषयाचा उहापोह केला. सजग नागरिक मंचचे जुगल राठी यावेळी उपस्थित होते.

गाडगीळ म्हणाले, ‘शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पुनरावलोकन अत्यंत आवश्यक आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. वाहनांच्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी रस्ते रुंद करण्यापेक्षा रस्त्यावर कमीत कमी वाहने कसे येतील, या अमेरिकन धोरणाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था, पादचाऱ्यांच्या हक्कासाठी सुस्पष्ट धोरण आवश्यक आहे. याचा अवलंब केल्यास नक्कीच वाहतूक कोंडी कमी होईल.’

पदपथांवर वाढते खर्च, अतिक्रमण, आणि वाहनतळांचा अभाव यांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला असणारा धोका अभ्यंकर यांनी अधोरेखित केला. वाहन चालविणाऱ्यांपेक्षा सर्वाधिक अधिकार चालणाऱ्यांना आहेत, याची आठवण करून दिली. ‘सुंदर शहराच्या विकासासाठी प्रथम पदपथ हा नागरिकांचा मूलभूत हक्क हा केंद्रबिंदू ठरवून नियोजन करणे, आराखडे बनवून त्यांची तंतोतंत अंमलबजावणी करणे आवश्यक आहे,’ असे अभ्यंकर यांनी सांगितले.

४१ टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे

वाहतूक विकास धाेरण संस्थेच्या (आयटीडीपी) २०२१-२३ च्या अहवालातील दाखले शितोळे यांनी दिले. ‘शहरातील अपघाती मृत्यूंच्या वाढत्या प्रमाणावर आणि पादचाऱ्यांच्या रक्षणासाठी योग्य धोरण तयार करण्यावर अहवालात जोर देण्यात आला. या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार पुणे शहरात ४१ टक्के मृत्यू हे पादचाऱ्यांचे असल्याचे सांगितले आहे. ५० टक्क्यांहून अधिक पदपथ अतिक्रमणबाधित असल्याने लोकांना चालण्यासाठीही सोयीचे नाहीत,’ असे शितोळे यांनी सांगितले.