पिंपरी : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी एका तरुणाने वाहतूक पोलीस हवालदाराला दगड फेकून मारहाण करून शिवीगाळ करत, ‘दोन दिवसांत विकेट काढतो,’ अशी धमकी दिली. ही घटना गुरुवारी देहू फाटा येथे घडली. याप्रकरणी हवालदाराने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी इस्माईल सैफान भागानगरे (वय २३, रा. भोसरी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार दिघी-आळंदी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. ते गुरुवारी सायंकाळी आळंदी येथील देहू फाटा येथे कर्तव्य बजावत होते. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना इस्माईलने वाहनावर होणारी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शासकीय कामात अडथळा आणला. हवालदाराला शिवीगाळ करत दगड फेकून मारहाण केली. यात हवालदाराच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि उजव्या हाताच्या मनगटाजवळ दुखापत झाली. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

आळंदीत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गजांआड

एका घरातून एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला आळंदीतून अटक करण्यात आली. सचिन भीमराव बागल (वय २४, रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमरसिंह रामभाऊ शेळके (२५, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन बागल याने फिर्यादी अमरसिंह शेळके यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून ८९ आणि १८ हजार रुपयांचे असे दोन मोबाइल संच, १६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी सचिन याला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

भोसरीत भरधाव बसच्या धडकेत दाम्पत्य जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव बसने धडक दिल्याने मोटारीमधील दाम्पत्य जखमी झाले आहे. ही घटना गुरुवारी (७ ऑगस्ट) दुपारी लांडेवाडी भोसरी येथे घडली. याप्रकरणी ५२ वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी मोटारीने घरी जात होते. त्या वेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील बस वेगात आणि निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या मोटारीला मागून धडक दिली. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला दुखापत झाली. त्यांच्या मोटारीचे नुकसान झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

घरात गॅस रिफिलिंग

घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस दुसऱ्या सिलिंडरमध्ये घरातच बेकायदारीत्या भरणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (७ ऑगस्ट) दुपारी खंडेवस्ती, भोसरी येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब भांगले यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल हे माहीत असूनही पुरेसा बंदोबस्त न ठेवता घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस मोकळ्या सिलिंडरमध्ये भरत होता. या वेळी त्याच्याकडून १७ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार

मोकळ्या जागेत गावठी हातभट्टीची दारू तयार करत असलेल्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (७ ऑगस्ट) दुपारी शिरगाव येथील पवना नदीकाठच्या मोकळ्या जागेत केली. याप्रकरणी पोलीस शिपाई अजित शिंदे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे ३००० लिटर गूळमिश्रित कच्चे रसायन आणि ५००० रुपये किमतीचे कागद व लोखंडी भांडे बाळगून होती. पोलिसांची चाहूल लागताच ती पळून गेली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.