पुण्यातील नानापेठेत काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी कारवाईदरम्यान क्रेनच्या सहाय्याने दुचाकी उचलली होती. त्यावेळी ती दुचाकी चालकासह उचलण्यात आली होती. त्या घटनेचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान अशीच काहीशी घटना पुण्यातील लक्ष्मी रोडवर घडली आहे. पोलिसांनी थेट सामनासह दुचाकी उचलली.
पुण्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मी रोडवर सोमवारी सकाळी ११ वाजता दोघे जण खरेदीसाठी दुचाकीवरून आले होते. यावेळी पार्किंगच्या बाहेर दुचाकी लावून ते खरेदीसाठी गेले होते. तेवढ्यात वाहतूक पोलिसांची गाडी नो पार्किंग किंवा पार्किंगच्या पांढर्या पट्टीबाहेर लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी आली. यावेळी दुचाकीमध्ये खरेदी केलेले साहित्य ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी त्या साहित्यासह क्रेनच्या मदतीने दुचाकी उचलली.
आपली गाडी उचलल्याचं दिसताच त्या दोघांनी वाहतूक पोलिसांकडे जात, ‘साहेब नुकतीच गाडी लावली होती. आमच्या साहित्याचं नुकसान होईल. आमची गाडी सोडा’ अशी विनंती केली. पण काही केल्या वाहतूक पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या कारवाईचे रेकॉर्डिंग होत असल्याचं लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी गाडी सोडून दिली.