पुणे : भरधाव वेगात दुचाकी चालवून नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात अल्पवयीन दुचाकीस्वार ठार झाला. उरळी कांचन परिसरातील मंतरवाडी-हांडेवाडी रस्त्यावर १६ सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.  मोहम्मद जकरिया नदीम खान (वय १७ रा. सय्यदनगर, हडपसर) असे ठार झालेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार प्रताप गुरव यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि त्याचा मित्र दुचाकीस्वार मोहम्मद खान हे १६ सप्टेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास मंतरवाडी-हांडेवाडी रस्त्यावरून जात होते. त्यावेळी मोहम्मद दुचाकी चालवित असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मोहम्मद गंभीररित्या जखमी झाला. तर, आफताब किरकोळ जखमी झाला. दोघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मोहम्मद खान याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तपास करीत आहेत.

शहरातील विविध भागात बहुतांश पालकांकडून अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने दिली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बेदरकारपणे वाहने चालवीत अल्पवयीन दुचाकीस्वार अपघातांना निमंत्रण देत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी अशाच अपघातात अल्पवयीनाला आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या ताब्यात वाहने देउ नका, असे आवाहन पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, तरीही अनेकांकडून मुलांचे लाड पुरविण्यासाठी वाहने ताब्यात दिली जात आहेत.