पुणे : सराफी पेढीत खरेदीचा बहाणा करून चोरी करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. वडगाव शेरी भागातील एका सराफी पेढीत खरेदीचा बहाणा करून दोन महिलांनी ६० हजारांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना घडली. याबाबत पेढीतील कर्मचाऱ्याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वडगाव शेरीतील जुन्या मुंढवा रस्त्यावर असलेल्या एका पेढीत कामाला आहेत. १२ जून रोजी रात्री आठच्या सुमारास दोन महिला खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत आल्या. त्यांनी तक्रारदाराला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगितले. तक्रारदाराला बोलण्यात गुंतविले. त्याचे लक्ष नसल्याची संधी साधून ६० हजारांची अंगठी चोरून महिला पसार झाल्या. अशाच पद्धतीची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात असलेल्या एका सराफी पेढीत नुकतीच घडली. चोरट्या महिलांनी खरेदीच्या बहाण्याने सोन्याची चमकी लांबविली होती. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चंदननगर पोलिसांकडून पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे.