पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची (बीएमसीसी) विद्यार्थिनी वैष्णवी आडकरने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जागतिक विद्यापीठ स्पर्धेत टेनिस या खेळात भारतीय संघात प्रतिनिधित्त्व करणाऱ्या वैष्णवीने कांस्य पदक पटकावले असून, ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. जर्मनी येथे फीसु जागतिक विद्यापीठ स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत भारतीय विद्यापीठ टेनिसच्या मुलींच्या संघात वैष्णवीचा समावेश होता. या पूर्वी १९७९मध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठाचे नंदन बाळ यांनी रौप्य पदक जिंकण्याची कामगिरी केली होती. त्यांनी पुरुष एकेरीमध्ये पदक मिळवले होते. त्यानंतर एकदाही भारतीय खेळाडूला पदक मिळवण्याची कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे वैष्णवीचे पदक हे आजवरचे केवळ दुसरेच पदक ठरले असून, योगायोग म्हणजे, ४६ वर्षांनी जागतिक विद्यापीठ स्पर्धेत भारताला मिळालेले पदकही पुण्यातील टेनिसपटूनेच पटकावले आहे.
बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये वैष्णवी शिकत आहे. वैष्णवीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व करून विद्यापीठाला अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्रवेश करून दिला होता. त्या बळावर विद्यापीठाचा संघ खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठीही पात्र ठरल्याची माहिती विद्यापीठाने दिली.
वैष्णवी आणि भारतीय टेनिस संघाच्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील कामगिरीचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, प्रभारी सहायक क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके यांनी अभिनंदन केले.