पुणे : ‘व्यंगचित्रांची मोठी परंपरा आपल्या राज्याला लाभली आहे. प्रत्येक कलाकाराने ही परंपरा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. या हास्यरेषांनी मराठी मनाला आकार दिला आहे. मात्र, मराठी माणसाकडून काही प्रमाणात व्यंगचित्रांच्या समृद्ध ठेव्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते,’ अशी खंत ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केली.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस वयाची शंभर वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त क्लब वसुंधरा आणि कार्टूनिस्ट्स कम्बाइन यांच्या वतीने ‘शि. द. १००’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील ‘हसरी गॅलरी’ या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कुलकर्णी यांनी व्यंगचित्र परंपरेची ओळख करून देणारा ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ हा दृक-श्राव्य कार्यक्रम सादर केला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे, महोत्सवाचे निमंत्रक राजकुमार चोरडिया, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, चारुहास पंडित या वेळी उपस्थित होते.
व्यंगचित्र परंपरेचा प्रवास उलगडताना कुलकर्णी यांनी जागतिक पातळीवर नाव कमावलेल्या व्यंगचित्रकारांसह दुर्लक्षित राहिलेल्या व्यंगचित्रकारांचा परिचय करून दिला. त्यांची विचारशैली, कुंचल्यांचे स्ट्रोक्स आणि बारकावे मांडण्याची पद्धत यावरही त्यांनी भाष्य केले. कुलकर्णी म्हणाले, ‘मराठीमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘हिंदूपंच’ या मासिकातून व्यंगचित्रांची परंपरा सुरू झाल्याचे दिसते. शांताराम किर्लोस्करांसारख्या उद्योजकाने व्यक्त होण्यासाठी व्यंगचित्रांचे माध्यम निवडले होते. त्यांच्यापासून ते आजच्या युवा व्यंगचित्रकारापर्यंत प्रत्येक मराठी कलाकाराने आपल्या रेषांमधून व्यंगचित्रांची परंपरा समृद्ध करण्यासाठी योगदान दिले आहे.’
‘संगीत, शिल्पकला, व्यंगचित्र, साहित्य, चित्रपट अशा विविध माध्यमांतून कलाकार व्यक्त होत असतो. भावना व्यक्त करण्यासाठी व्यंगचित्र हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. जगाच्या इतिहासात अनेक विचारवंत या माध्यमाच्या आधारे व्यक्त झालेले दिसतात. आता काळ बदलतो आहे. मात्र, अद्यापही व्यंगचित्रे थेट परिणाम साधतात, कलादालनाची शोभा वाढवतात.’ असे रामपुरे यांनी सांगितले.
चित्राव यांनी प्रास्ताविक केले. संजय मिस्त्री यांनी सूत्रसंचालन केले, आभार मानले.
सृजनात्मक कलेसाठी व्यक्तीला अनेक वाटा सापडतात. शि. द. फडणीस यांनी व्यंगचित्रांची वाट निवडली. त्यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून शब्दविरहीत संवादाचा मोठा पट मांडला. ‘शिदं’ हे खऱ्या अर्थाने व्यंगचित्र क्षेत्रातील तपस्वी व्यक्तिमत्त्व आहेत. – भगवान रामपुरे, ज्येष्ठ शिल्पकार