जपान म्हटले, की आपल्याला केवळ ‘सायोनारा’ हा एकच शब्द आठवतो. साहित्यामध्ये ‘हायकू’ हा काव्यप्रकार ठाऊक असतो. तोदेखील आचार्य अत्रे यांच्या कन्या आणि ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांच्यामुळे. पण, जपानी साहित्य याही पलीकडे किती समृद्ध आहे, याचा प्रत्यय पुणेकरांनी नुकताच ‘कथनी’ या अनोख्या कार्यक्रमाद्वारे घेतला.
जपानी भाषा शिकण्याची अनेकांना आस असते. ही भाषा अवगत झाली, तर त्यातील समृद्ध साहित्याचा आनंद लुटता येतो याची प्रचिती ‘पूर्वनाद’ संस्थेने सादर केलेल्या ‘कथनी’ या आगळ्यावेगळ्या धाटणीच्या दृक-श्राव्य संगीतमय कार्यक्रमाने पुणेकरांना दिली. हा कार्यक्रम शैक्षणिक दृष्टिकोनातून जितका समृद्ध होता तितकाच कलात्मकदृष्ट्याही प्रभावी ठरला. जपानी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक सलिल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या ‘पूर्वनाद’ संस्थेचे सर्व सभासद हे जपानी भाषा आणि साहित्याचे विद्यार्थी आहेत. ‘कथनी’ या कार्यक्रमात जपानी साहित्यातील विविध कालखंड, लेखक, काव्यप्रकार, गोष्टी आणि संस्कृतीचा परिचय संगीत, अभिवाचन आणि दृक-श्राव्य माध्यमांच्या साहाय्याने झाला.
कार्यक्रमात आठव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या जपानी साहित्याचा प्रवास उलगडला गेला. दिवेंद्र केळकर, प्राजक्ता मुळेकर, इशिता देशमुख, अर्चना वैद्य, अनघा जोगळेकर, वंदना पवार, उन्नती पवार, आर्य चांदेकर, गौरी शेंबेकर, मुस्कान, सारंग वैद्य, बकुल वैद्य आणि सलिल वैद्य यांचा कार्यक्रमात समावेश होता. पारंपरिक जपानी संगीताचा वापर, चित्र, मराठी भाषेतून दिलेली माहिती आणि सादर केलेले अनुवाद यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला.
लष्करी अधिकाऱ्यांचा सन्मान
जादूगार रघुवीर यांच्या १०१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवारी (१७ मे) आणि रविवारी (१८ मे) जादूच्या प्रयोगाचे तीन खेळ पुणेकरांना अनुभवता येणार आहेत. त्यापैकी रविवारी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात लष्करी अधिकाऱ्यांचा सन्मान करून जादूगार रघुवीर कुटुंबीय सामाजिक बांधिलकीची प्रचिती देणार आहेत.
भारतीय सैन्याने अलौकिक पराक्रम करून देशाला अबाधित ठेवले. सैन्यातील माजी अधिकारी ज्यांनी आपल्या विशेष कामगिरीने देशाचे नाव उंचावले अशा लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या सेनाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जादूगार रघुवीर यांचे नातू जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी दिली. कर्नल अमित कासोदेकर, कर्नल पराग मोडक, कर्नल आशिष कर्णिक, ऑनररी कॅप्टन विनायक आहेर, नाईक प्रकाश पिंगळे, नौदलाचे ऑफिसर विनंदर सिंग, कॅप्टन संजय वैद्य, हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन प्रविर पुरोहित या लष्करी अधिकाऱ्यांचा एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) नितीन वैद्य, एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) जयंत इनामदार, ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे केदार चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
या प्रयोगांमध्ये जादूगार जितेंद्र रघुवीर युरोप, सिंगापूर, अमेरिका अशा २९ देशांत नावाजलेल्या जादूसह नवीन जादूचे सादरीकरण करणार आहेत. मोठ्या पिंजऱ्यात चिंपाझी, कॅमेरा मॅजिक, आफ्रिकन वूडु मॅजिक अशा नवीन जादू या प्रयोगामध्ये सादर केल्या जातील. अक्राळविक्राळ जापनीज डायनोसोरबरोबर जादूगार जितेंद्र रघुवीर यांची लढत आणि भुतांचा नाच ही वैशिष्ट्येही प्रयोगामध्ये आहेत. ‘जादूला विज्ञानाचा भक्कम पाया आहे. जिथे कल्पनाशक्ती संपते, तिथे जादू सुरू होते,’ अशी आमची धारणा असल्याचे जितेंद्र रघुवीर यांनी सांगितले. जादूगार रघुवीर हे जादूच्या प्रयोगातील एक महत्त्वाचे मराठी शिलेदार. त्यांची चौथी पिढी आता या क्षेत्रात कार्यरत असून, जादूच्या प्रयोगाद्वारे गेली ८७ वर्षे रंगभूमीवर योगदान देत आहे.
vidyadhar.kulkarni@expressindia.com