पुणे : सतत खोकला, ताप, वजन कमी होणे आणि न्युमोनियामुळे एक ६० वर्षीय महिला त्रस्त होती. सुरुवातीला तिला क्षय अथवा फुप्फुसाच्या कर्करोगाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. अखेर तपासणीत तिच्या फुफ्फुसात एक वस्तू अडकल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी रिजिड ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ती वस्तू बाहेर काढली, त्या वेळी ती सुपारी असल्याचे आढळले.

या महिलेला सतत खोकला सुरू होता. याचबरोबर तिला तापही येत होता. त्यामुळे वारंवार न्यूमोनिया होऊन तिचे वजन कमी झाले होते. तिने डॉक्टरांना दाखविले त्या वेळी क्षय अथवा फुप्फुसाच्या कर्करोगाची शक्यता वर्तविण्यात आली. त्यानुसार तिच्यावर उपचारही सुरू झाले. मात्र, दीर्घ काळ उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती आणखी खालावू लागली. या महिलेला उपचारानंतर आराम मिळत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी तिला मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. आनंद यन्नावार यांनी महिलेवर व्हर्च्युअल ब्रॉन्कोस्कोपी व सिटी स्कॅन केले. त्यातून तिच्या उजव्या फुप्फुसात एक वस्तू अडकल्याचे निष्पन्न झाले.

डॉ. यन्नावार यांच्या नेतृत्वाखाली रिजिड ब्रॉन्कोस्कोपीद्वारे कोणतीही चिरफाड न करता ही वस्तू महिलेच्या फुप्फुसातून यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. त्या वेळी ती वस्तू सुपारी असल्याचे निदर्शनास आले. सर्वसाधारणपणे श्वसननलिकेतून रुग्णाच्या शरीरात धातूची नळी सोडली जाते. या नळीच्या माध्यमातून रुग्णाच्या शरीरात अडकलेली वस्तू बाहेर ओढून काढली जाते. या प्रक्रियेमध्ये रुग्णाला भूल देणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीने श्वासनलिकेवाटे गिळलेल्या वस्तू बाहेर काढण्यासाठी या प्रक्रियेचा वापर होतो. या प्रक्रियेमध्ये डॉ. सुमीत चौधरी, डॉ. कल्याणी लोंढे, डॉ. महादेवन वैद्यनाथन, डॉ. प्रियंका यांचा समावेश होता.

या महिलेला झोपताना सुपारी खाण्याची सवय होती. जवळपास आठ महिने ती सुपारी तिच्या श्वसननलिकेत अडकून राहिली होती. त्या दरम्यान क्षय व न्यूमोनियासारख्या रोगांवर उपचार सुरू होते. अखेरीस योग्य निदान झाल्यानंतर आम्ही रिजिड ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ती सुपारी बाहेर काढली आणि रुग्णाची प्रकृती लगेच सुधारली. केवळ दोन दिवसांत तिला घरीही सोडण्यात आले. – डॉ. आनंद यन्नावार, श्वसनविकारतज्ज्ञ