पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागा देण्यासाठीच्या प्रक्रियेला गती मिळत असून आत्तापर्यंत ७२ टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनाला संमती दिली आहे. त्यानुसार १ हजार ९८० शेतकऱ्यांनी २ हजार ३० एकर जागा जिल्हा प्रशासनाला देण्यासंदर्भात संमतिपत्रे दिली आहेत. दरम्यान, संमतिपत्रे सादर करण्यासाठी सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

पुरंदर विमानतळासाठीची भूसंपादन प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून संमतिपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. संमतिपत्र सादर करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली असून, ही मुदत १८ सप्टेंबर रोजी संपणार आहे. या मुदतीत संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना विकसित भूखंडासह चाैपट मोबदलाही देण्यात येणार आहे. भूसंपादनाला गती देण्यासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधून साडेसात हजार एकरऐवजी आता तीन हजार एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने पुरंदरमधील एखतपूर, कुंभारवळण, खानवडी, मुंजवडी, उदाचीवाडी, पारगाव आणि वनपुरी या सात गावांमधून भूसंपादनापूर्वी संमती घेण्याचे काम सुरू आहे. भूसंपादनाची ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर तालुक्यातील सात गावांमध्ये पहिल्याच आठवड्यात १ हजार ५८० एकर जमिनीची म्हणजेच सुमारे ५६ टक्के जमीन देण्याची तयारी दर्शविली होती. तशी संमतिपत्रेही जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांनी दिली होती. त्यानंतर या प्रक्रियेने आणखी वेग घेतला आहे.

सात गावातील १ हजार ९८० शेतकऱ्यांनी संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाला दिली आहेत. एकूण ७२ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्याने २ हजार ३० एकर क्षेत्र जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. दरम्यान, शेतकऱ्यांकडून संमतिपत्रे देण्यात येत असल्याने विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

‘पुरंदर विमानतळासाठी प्रारंभी जमीन देण्यास विरोध होत असल्याने साडेसातऐवजी तीन हजार एकर जमीन संपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळासाठी आवश्यक जमीन संपादन झाल्यानंतर तीन हजार एकर जमिनीबाहेरील जागेवरील विमानतळासाठीचा शेरा उठविण्यात येणार आहे. त्यानुसार सुमारे चार हजार एकर जागेवरील असलेले शेरे काढण्यात येणार आहेत.