उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
पुणे : पुण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेत बदल केला जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. याशिवाय प्रकल्पाच्या जागेबाबत ज्यांचा विरोध आहे, त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रिया आणि अन्य प्रशासकीय कामकाजासाठी शहरात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी – एमएडीसी) कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नुकत्याच मुंबईत मुलाखती झाल्या. विमानतळ उभारणीशी संबंधित विविध विभागांशी या कार्यालयातून समन्वय साधण्यात येणार आहे.
विमानतळाच्या भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकारी म्हणून सात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. भूसंपादनाबरोबरच प्रकल्पग्रस्तांना परतावा देणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) आदी विभागांशी समन्वय साधून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुण्यात एमएडीसीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री पवार यांनी पुण्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. विमानतळाच्या जागेत बदल करता येणार नसून या जागेला ज्यांचा विरोध आहे, त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न राहील.
तांत्रिकदृष्टय़ाही विमानतळाची जागा बदलणे अशक्य
लोहगाव येथील आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची एक छोटी अशा दोन धावपट्टय़ा आहेत. पुरंदर विमानतळाचे हवाई क्षेत्र सामाईक होईल किंवा बाधित होईल असा आक्षेप हवाई दलाकडून घेण्यात आला होता. त्यावर पुरंदरहून होणाऱ्या उड्डाणांची उंची कमी ठेवणे, तसेच मुंबई – हैदराबाद, मुंबई बेंगळुरू यांचे हवाई क्षेत्र बाधित होऊ नये म्हणून मार्गाची फेरआखणी करण्याचे ठरले आहे. लोहगाव आणि पुरंदर विमानतळांमध्ये सामंजस्य, समन्वय असण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष (एअर ट्रॅफिक कण्ट्रोल – एटीसी) असणे आवश्यक असून हा कक्ष पुरंदर विमानतळ क्षेत्रात न ठेवता लोहगाव येथेच ठेवण्यावर एकमत झाले आहे. या शिवाय केंद्र, राज्य सरकारच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असून केवळ परताव्यांचे पर्याय निश्चितीकरण बाकी आहे, या पाश्र्वभूमीवर तांत्रिकदृष्टय़ाही विमानतळाची जागा बदलणे अशक्य आहे.