पुणे : देशातील सायबर गुन्हेगारांकडून आता कृत्रिम प्रज्ञा (एआय) संचलित चॅटबॉटचा फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. एआयचा प्रभावीपणे वापर करून सायबर गुन्हेगार बँका, वितरण सेवा आणि सरकारी संस्थांची अचूकतेने नक्कल करीत आहे. या माध्यमातून एकाचवेळी हजारो नागरिकांची फसवणूक करू शकतील, अशा स्वयंचलित प्रणाली चालविण्यासाठी पूर्व-प्रशिक्षित लॅग्वेज मॉडेलचा वापर सुरू आहे, अशी माहिती क्विक हील टेक्नॉलॉजीजच्या संशोधनातून समोर आली आहे.

क्विक हील टेक्नॉलॉजीजच्या सेकराइट लॅब्जमधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. हे देशातील सर्वांत मोठे मालवेअर विश्लेषण केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला एआय आधारित फसवणुकीची हजारो साधने शोधली जात आहेत. या वर्षी एआय संचलित चॅटबॉट हा सर्वांत मोठा डिजिटल धोका असल्याचे समोर आले आहे. पारंपरिक फिशिंग प्रकारांप्रमाणे स्वयंचलित यंत्रणा वर्तमानातील संभाषण लगेच आत्मसात करतात. त्यानंतर या माध्यमातून बनावट वितरण शुल्कापासून सीमा शुल्क ते तंत्रज्ञान पाठबळ, अशा प्रकाराच्या नागरिकांच्या प्रश्नांना प्रतिसाद दिला जातो. एका सर्व्हरच्या माध्यमातून एकाच वेळी हजारो नागरिकांशी हा संवाद साधला जातो, असे संशोधनात म्हटले आहे.

क्विक हील टेक्नॉलॉजीजने केलेल्या विश्लेषणात फसवणुकीच्या अनेक प्रकारांमध्ये संवादात्मक प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याच्या मानवी वृत्तीचा फायदा घेतला जात असल्याचे उघड झाले आहे. बनावट ग्राहक प्रतिसाद चॅटबॉट हे ग्राहकाच्या बँक खात्यात काही अडचण आल्याचा इशारा देतात. ग्राहकांकडून त्यांच्या खात्याचा सर्व तपशील मिळविला जातो. ग्राहकांना ते अधिकृत प्रतिसाद केंद्र नाही हे कळण्याआधी हे सर्व घडते. याचवेळी प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार लँग्वेज मॉडेलचा वापर करून केले जात आहेत. त्यात एआय निर्मिती छायाचित्रांचा वापर केला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीची फसवणूक केली जाते. काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या आवाज क्लोन करून आपत्कालीन परिस्थिती असल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकारही वाढू लागल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

हुबेहूब संकेतस्थळे

एखादी बँक अथवा वितरण संस्थेचे हुबेहूब तयार केले जाते. या संकेतस्थळाच्या पत्त्यामधील (डोमेन) एखादे अक्षर वेगळे असते. त्यामुळे ग्राहकांच्या निदर्शनास यातील बनावटपणा येत नाही. नुकताच एका मोठ्या वितरण संस्थेप्रमाणे चॅटबॉट तयार करून त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. या चॅटबॉटच्या माध्यमातून ग्राहकांकडून त्यांच्या वस्तूंसाठी सीमा शुल्काची मागणी करण्यात आली होती. याचबरोबर व्हॉट्सॲप बॉटचाही वापर केला जात असून, त्यातून ग्राहकांची खासगी माहिती गोळा केली जाते, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

चॅटबॉटमधील धोका कसा ओळखावा…

– ओटीपीची मागणी

– बँकेशी निगडित तपशील

– पासवर्डबद्दल माहिती

– संभाषणातील चुकीचे व्याकरण

– संवादातील तातडीची स्थिती

– संशयास्पद यूआरएल