पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जलसंपदा विभागाच्या मालकीची संपादित जमीन काही स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने सुशोभित करण्यात आली होती. त्या जागेवर बेकायदा बंगले, फार्म हाऊस, हाॅटेल्स आणि रिसाॅर्ट तसेच काही खासगी कंपन्या उभारण्यात आल्याची कबुली राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी विधासभेमध्ये दिली.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी धरण क्षेत्रातील अतिक्रमणासंदर्भात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही कबुली दिली.
‘खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोऱ्हे बुद्रुक, खानापूर, गोऱ्हे खुर्द आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भराव टाकून अतिक्रमणे केल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यावर परिणाम होत आहे का, त्यासंदर्भात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यास स्थानिक पोलीस प्रशासनही सहकार्य करत नसून, अतिक्रमणधारकांकडून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जागांवर बंगले, फार्म हाऊस, हाॅटेल्स, रिसाॅर्ट आणि खासगी कंपन्यांची उभारणी करण्यात आली आहे का,’ अशी विचारणा तापकीर यांनी केली.
‘मात्र, भराव टाकून अतिक्रमण झाले नसून, धरणातील पाणीसाठ्यावरही कोणताही विपरित परिणाम झालेला नाही. जलसंपदा विभागाच्या जागांवर अतिक्रमणे झाली असून, अतिक्रमण करणाऱ्यांना रितसर नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाच्या स्थापत्य आणि यांत्रिक विभाग, पुणे महानगरपालिका, महसूल तसेच गृह विभागाच्या सहकार्याने करण्यात येत आहे,’ अशी माहिती विखे-पाटील यांनी सभागृहात दिली. ‘खडकवासला धरण परिसरातील सरकारी वहिवाटीचे रस्ते, आणीबाणीच्या प्रसंगी वापरण्यात येणारे प्रवेश मार्ग अतिक्रमणांमुळे बंद झालेले नाहीत,’ असा दावाही विखे-पाटील यांनी केला.
‘धरणांच्या संरक्षक व्यवस्थेत त्रुटी नाहीत’
‘खडकवासला संयुक्त प्रकल्पांतर्गत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या संरक्षक व्यवस्थेत कोणत्याही गंभीर त्रुटी नाहीत,’ असा दावाही मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. खडकवासला धरण रिसरात २३, पानशेत धरण क्षेत्रात ११, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १० आणि टेमघर धरणाच्या परिसरात सहा अशा एकूण ५० सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये धरणाची सुरक्षा केली जात आहे. खडकवासला धरणाच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले असून धरणाच्या डाव्या बाजूला पोलीस सुरक्षा चौकी असून, ती २४ तास कार्यरत आहे. सध्याची सुरक्षा यंत्रणा अपुरी नाही,’ असे विखे-पाटील यांनी सांगितले.