पुणे : कर्करोगाच्या रुग्णांवर रेडिओथेरपीसाठी अत्याधुनिक टोमोथेरपी ही पद्धत अचूक ठरत आहे. टोमोथेरपी रेडीझॅक्ट एक्स ९ प्रणालीमुळे रुग्णांवर अधिक परिणामकारकरित्या उपचार करणे शक्य होत आहे. या प्रणालीत कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्यात आल्याने ती रुग्णांसाठी सुरक्षित ठरत आहे. आशियात पहिल्यांदा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये या प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. त्यातून रुग्णांवर यशस्वीपणे उपचारही करण्यात आले आहेत.

सह्याद्री हॉस्पिटचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. संजय एच. यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, एखाद्या कर्करुग्णावर रेडिओथेरपीद्वारे उपचार करताना त्याच्या हालचाली नियंत्रित करणे ही बाब अतिशय महत्वाची ठरते. आधीच्या उपचारपद्धतीमध्ये या बाबीमुळे अनेक समस्या येत. आता नवीन प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक अचूक बनली आहे. कर्करोगग्रस्त पेशींवर रेडिओथेरपी केली जात असून, रुग्णाच्या शरीरातील इतर अवयवांना इजा होण्याचा धोका यामुळे कमी झाला आहे. या प्रक्रियेत रुग्णाच्या शरीरावर रेडिओथेरपी करताना लाखो लेझर पॉइंटचा वापर केला जातो. यामुळे रेडिओथेरपी योग्य पद्धतीने होते.

हेही वाचा >>>पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी घडामोड; बाजार समितीच्या सभापतींचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा ठराव मंजूर

याबाबत सह्याद्री हॉस्पिटलच्या कर्करोग विभागाच्या संचालिका डॉ. शोना नाग म्हणाल्या की, जगात व्हायटलहोल्ड तंत्रज्ञानाने सज्ज रेडीझॅक्ट एक्स ९ प्रणाली केवळ तीन ठिकाणी वापरली जाते. त्यात सह्याद्री हॉस्पिटलचा समावेश आहे. रुग्णांना आधुनिक उपचार यामुळे उपलब्ध होत आहेत. आगामी काळात या उपचारांचा समावेश आरोग्य विम्यात झाल्यास जास्तीत जास्त कर्करुग्णांना याचा फायदा होईल.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकी प्रणाली काय आहे?

रेडीझॅक्ट एक्स ९ प्रणाली रुग्णाच्या शरीरावर ३६० अंशातून रेडिओथेरपी केली जाते. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे केवळ कर्करोगग्रस्त पेशी नष्ट केल्या जातात. शरीरातील इतर निरोगी पेशी आणि अवयवांना इजा टाळली जाते. आता व्हायटलहोल्ड तंत्रज्ञानामुळे तिची कार्यक्षमता वाढली आहे. फुफ्फुसे आणि स्तन या छातीतील अवयवांच्या कर्करोगावरील उपचारांसाठी हे खूप उपयोगी ठरते. त्यामध्ये अचूकपणे कर्करोगग्रस्त पेशी नष्ट केल्या जातात आणि हृदयाला इजा होत नाही. रेडिओथेरपी सुरू असताना रुग्णाने शरीराची हालचाल केल्यास आपोआप हे प्रक्रिया बंद होते. त्यामुळे अधिक सुरक्षित ठरते.