पुणे : मध्य रेल्वेच्या लोणावळा-पुणे विभागातील खडकी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे लांब पल्ल्याच्या १० आणि २६ उपगनगरीय गाड्यांचा या स्थानकावरील थांबा दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याने रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वेगाड्यांना विलंब झाला. आज (१३ जुलै) दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत खडकी रेल्वे स्थानकावरील थांबा रद्द करून पर्यायी मार्गाने गाड्या सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी खडकी आणि हडपसर या स्थानकांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या स्थानकांवरून लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याने विस्तारीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. सद्य:स्थितीत खडकी रेल्वे स्थानकातील चार आणि पाच या फलाटांवर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.
सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक काम झाले असून, तांत्रिक सुविधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री १२ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आला. रविवारी (१३ जुलै) दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकी रेल्वे स्थानकावरील थांबा रद्द करून पर्यायी मार्गाने गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
प्रवाशांना त्रास
खडकी रेल्वे स्थानकावरून उपगनरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद ठेवल्याने पहिल्या दिवशी रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली. लोकल सेवादेखील विलंबाने धावल्याने नियोजित ठिकाणी पोहोचण्यास प्रवाशांना विलंब लागला. अचानक वाहतूक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
विलंब झालेल्या गाड्या
क्रमांक – गाडी – विलंब
२२१५९ – चेन्नई एक्सप्रेस – १ तास
११००८ – डेक्कन एक्सप्रेस – दीड तास
१७२२२ – काकीनाडा एक्सप्रेस – ३० मिनिटे
१६३३९ – नागरकोयल एक्सप्रेस – २ तास
२२९४३ – दौंड-इंदोर एक्सप्रेस – दीड तास
मालवाहतुकीवरही परिणाम
खडकी स्थानकावरून प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करणाऱ्या गाड्या धावतात. या स्थानकावरून रेल्वे गाड्यांची वाहतूक वळविल्याने मालवाहतुकीच्या गाड्यांना फटका बसला. या गाड्या टप्प्याटप्प्याने सायंकाळनंतर सोडण्यात आल्या, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.
पुनर्बांधणी करण्यात येत असलेल्या खडकी स्थानकावरील तांत्रिक दुरुस्तीसाठी काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. काही गाड्यांना विलंब होत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवाशांनी तात्पुरते बदललेले वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे. – हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग