रेल्वेच्या पुणे विभागाने मागील काही दिवसांपासून उत्पन्नाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करण्याची मालिकाच सुरू केली आहे. मालवाहतुकीसाठी रेल्वेला पसंती दिली जात असल्याने त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातही मागील काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. यंदा एप्रिल ते ऑगस्ट या केवळ पाचच महिन्यांच्या कालावधीमध्ये पुणे विभागाने तब्बल दीडशे कोटी रुपायांची कमाई केली आहे. उत्पन्नाचा हा एक नवा उच्चांक आहे.
रेल्वेच्या पुणे विभागामध्ये मागील काही वर्षांमध्ये प्रवाशांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासी भाडय़ातून मिळणाऱ्या उत्पन्नातही दरवर्षी वाढ नोंदविण्यात येत आहे. पुणे विभागाचे एकूण वार्षिक उत्पन्न काही वर्षांपूर्वी सहाशे ते सातशे कोटींवर मर्यादित होते. मात्र, मागील काही वर्षांपासून उत्पन्नात भर पडत गेली व काही महिन्यांपूर्वी पुणे विभागाच्या एकूण उत्पन्नाने हजार कोटींच्याही वर उसळी घेतली आहे. त्यात मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटाही मोठा आहे.
चालू आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत सुमारे दीडशे कोटी रुपयांचे उत्पन्न मालवाहतुकीतून मिळाले. मागील वर्षी याच कालावधीत सुमारे १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे यंदा त्यात तब्बल पन्नास कोटींची वाढ झाल्याचे दिसते आहे. मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाढीमध्ये साखरेच्या वाहतुकीचा वाटा मोठा आहे. साखरेच्या वाहतुकीसाठी रेल्वेकडून काही प्रमाणात सवलत देण्यात येत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून साखरेची वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.
दीडशे कोटींच्या मालवाहतुकीच्या कमाईमध्ये साखरेच्या वाहतुकीतून मिळालेले उत्पन्न ११७ कोटी रुपये आहे. मागील वर्षी याच कालावधीत केवळ ६४.१२ कोटी रुपयांचे उत्पन्न साखरेच्या वाहतुकीतून मिळाले होते. त्यात यंदा पन्नास कोटींहून अधिक रुपयांची भर पडली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा व बारामती या स्थानकांवरून प्रामुख्याने साखरेची वाहतूक केली जाते. पुढील कालामध्येही मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातील, असे पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Sep 2015 रोजी प्रकाशित
मालवाहतुकीच्या उत्पन्नात पुणे रेल्वेचा उच्चांक!
पुणे विभागाने उत्पन्नाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करण्याची मालिकाच सुरू केली आहे

First published on: 10-09-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway transport income goods