पावलस मुगुटमल
पुणे : जूनच्या अखेरपर्यंत पावसाने दिलेल्या ओढीमुळे राज्यापुढे जलसंकट उभे राहिले होते. ३० जिल्ह्यांमध्ये पाऊस उणा होता आणि धरणांनीही तळ गाठला होता. मात्र गेल्या दहा दिवसांतील पावसामुळे राज्यावरील जलसंकट दूर झाले आहे. राज्यात ३० टक्के उणा असलेला पाऊस आता सरासरीपेक्षा २० टक्के अधिक झाला आहे. त्याचप्रमाणे २० टक्क्यांपर्यंत खाली आलेला धरणांतील पाणीसाठा सध्या ३२ टक्क्यांहून अधिक झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत तो पाच टक्क्यांनी जास्त आहे. सध्या विदर्भात पावसाने थैमान घातले असून, राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांना वेग नसल्याने राज्यात मोसमी पाऊस दाखल होऊनही जून महिन्यात हवा तसा पाऊस झाला नाही. परिणामी एकूण राज्यात सरासरी ३० टक्क्यांहून कमी पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे धरणांतील पाणीसाठय़ानेही तळ गाठला होता. पेरण्यांबाबतही चिंतेची स्थिती होती. मात्र, जुलैमध्ये पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली. अरबी समुद्रातून मोठय़ा प्रमाणावर बाष्पाचा पुरवठा होऊ लागल्याने दक्षिण कोकणातून पावसाने जोर धरला. कोकण विभागातील सर्व जिल्हे, मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरू झाला. गेल्या तीन-चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पाऊस झाला. जुलैच्या सुरुवातीपासून आणि प्रामुख्याने आठवडय़ात झालेल्या पावसाने राज्यातील चित्र पालटले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि विदर्भातील वाशिम हे दोन जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांत पाऊस सरासरीच्या पुढे आहे. जूनच्या अखेरीस ३० जिल्ह्यांत पाऊस उणा होता. त्यामुळे राज्यातील पावसाची टक्केवारीही सरासरीच्या पुढे गेली आहे. परिणामी, धरणांतील पाणीसाठय़ातही मोठी वाढ झाली आहे. जूनच्या अखेरीस राज्यातील धरणांमध्ये २० ते २१ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत तो कमी होता. त्यामुळे पाण्याबाबत चिंता व्यक्त होत होती. अनेक ठिकाणी पाणीकपातही सुरू करण्यात आली होती. मात्र, दहा दिवसांतच धरणांत १२ टक्के पाणीसाठय़ाची भर पडली. सध्या ३२ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. आणखी आठवडाभर पाऊस होणार असल्याने त्यात मोठी भर पडेल.
धरणांतील विभागवार पाणीसाठा (टक्क्यांत)
विभाग गतवर्षी यंदा
अमरावती ३२.०८ टक्के ३८.८५
औरंगाबाद २५.६४ टक्के ३०.३८
कोकण ३८.५३ टक्के ५९.३७
नागपूर ३५.३५ टक्के ३५.६६
नाशिक २०.४९ टक्के २९.०१
पुणे २५.८५ टक्के २५.०९
पाऊसमान..
- राज्यातील बहुतांश भागात पुढील आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस.
- मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार, तर पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा.
- पुणे, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांतही दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा, साताऱ्यात मुसळधार.
- औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आदी भागांत मुसळधार.
- गडचिरोलीत अतिवृष्टी, तर अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांत मुसळधारांची शक्यता.