विदर्भात पुन्हा गारपिटीचा इशारा; मध्य महाराष्ट्रात पाऊस

पुणे : राज्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती असल्याने गारवा जाणवत आहे. मात्र, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार असून, पुढील दोन दिवस थंडीसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ८ जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी पुन्हा गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

डिसेंबर महिन्यामध्ये वातावारणातील बदलांमुळे हवामानात सातत्याने चढ-उतार झाल्यामुळे कडाक्याची थंडी अवतरली नाही. जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्याच्या बहुतांश भागात कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाल्याने त्याचप्रमाणे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहातील अडथळे दूर झाल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात थंडी अवतरली. विदर्भात गेल्या आठवडय़ात तीन दिवस थंडीची लाट आली होती. मात्र, त्यानंतर वातावरणात झपाटय़ाने बदल होत विदर्भाला गारपिटीने झोडपून काढले. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी होती. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला.

सद्य:स्थितीत हवामानात पुन्हा बदल होत आहेत. मध्य प्रदेशच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा काही दिवस ढगाळ हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या कोकण विभागातील मुंबईसह रत्नागिरीत किमान तापमानात घट आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, महाबळेश्वर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात गारवा आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद. जालना, बीड आदी ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास, तर विदर्भामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा खाली आल्याने या भागात चांगलाच गारवा आहे. त्यात पुढील दोन ते तीन दिवसांत चढ-उतार होणार आहेत.

पावसाची शक्यता कुठे, कधी?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ७ जानेवारीला मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ८ जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही तुरळक ठिकाणी पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील सातारा, सोलापूर, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यंमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. ९ जानेवारीलाही विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.