पुणे : गेले काही दिवस शहर आणि परिसरात सातत्याने पाऊस पडला. मात्र, बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. आता पुढील दोन दिवस मध्यम स्वरुपाची, तर घाट परिसरात मुसळधारेची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवारपासून दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण, हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मोसमी वारे पुण्यात दाखल झाल्याचे हवामान विभागाने सोमवारी जाहीर केले. मात्र, मंगळवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. बुधवारी सकाळी ऊन पडले होते. दिवसभरात काही तुरळक सरी पडल्या. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री नऊपर्यंत शिवाजीनगर येथे ७.२, लोहगाव येथे १७.६, चिंचवड येथे ७, मगरपट्टा येथे १७, कोरेगाव पार्क येथे १०, तर एनडीए येथे एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली.