समाजाच्या वंचित घटकातील मुला-मुलींना नाट्य प्रशिक्षण देत त्यांच्यातील कलागुणांना वाव देताना नाट्याविष्काराचे इंद्रधनू खुलविण्याचे काम ‘द रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन’ या संस्थेमार्फत केले जात आहे. नाट्य क्षेत्रात आपली नाममुद्रा प्रस्थापित केलेल्या कलाकारांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून नाट्यकलेच्या प्रचार-प्रसारासाठी उचललेले हे पाऊल केवळ मनोरंजनासाठी नाही, तर समाजातील विविध प्रश्नांकडे नाट्याविष्कारातून लक्ष वेधत त्यावर उपाययोजना करण्याचे कामही प्रभावीपणे होत आहे.
द रेनबो फाउंडेशनच्या विभावरी देशपांडे, राधिका इंगळे, हृषीकेश देशपांडे आणि श्रीरंग गोडबोले हे ग्रिप्स रंगभूमीचे कलाकार आहेत. फाउंडेशनच्या वतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया आर्ट (स्मार्ट) आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या वतीने मुलांसाठी आणि कुमारांसाठी नाटकांचे सादरीकरण, कार्यशाळा, वारसा स्थळांना भेट (हेरिटेज वाॅक) असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेच्या संस्थापकांचा जर्मनीतील ग्रिप्स थिएटरशी ४० वर्षांचा प्रदीर्घ संबंध आहे. गेल्या वर्षी फाउंडेशनने नेदरलँड्समधील ‘१० चिल्ड्रन’ या उपक्रमात सहभागी होऊन एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेतला. दहा देशांमध्ये आयोजित होत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश वंचित मुलांच्या समस्यांविषयी जागतिक स्तरावर जागरूकता वाढवणे होता. भारतामध्ये या प्रकल्पाचा गरिबी आणि मुली असा मध्यवर्ती विषय आहे.
फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी पुणे शहरातील ६० झोपडपट्ट्यांमध्ये व्यापक स्तरावर संशोधन केले. यामध्ये व्यक्तिनिहाय अभ्यास करणे, कुटुंबांच्या मुलाखती, आकडेवारी गोळा करणे आणि वैयक्तिक गोष्टी एकत्रित करणे यांचा समावेश होता. या प्रयत्नांची परिणती म्हणून २१ डिसेंबर २०२४ रोजी ‘१० चिल्ड्रन’ प्रकल्पाने पाच प्रमुख उपक्रमांचे आयोजन केले. या अंतर्गत पौगंडावस्थेत पोहोचल्यावर शाळेतून काढल्या गेलेल्या मुलींच्या कठीण परिस्थितीवर प्रकाश टाकणारे ‘सोप्पं नसतं काही’ हे नाटक सादर झाले. मुलींच्या समस्यांवर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांच्या अनुभवांचे कथन करणाऱ्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. ६० झोपडपट्ट्यांमधील मुलींनी ग्राफिक कलाकारांच्या मदतीने तयार केलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन आयोजित केले गेले. शाळेतील मुलींच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व विशद करणारा माहितीपट दाखविण्यात आला. या सर्व उपक्रमांना एकत्र आणण्यासाठी आयोजित परिषदेत या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था, सरकारी अधिकारी, कायदा अंमलबजावणी संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व करणाऱ्या संस्थांनी एकत्रितपणे गरिबीमुळे मुलींना येणाऱ्या समस्यांवर विचारविनिमय केला.
द रेनबो फाउंडेशनच्या वतीने माध्यम संस्थेच्या सहकार्याने ६ ते ८ वर्षे आणि ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी नृत्य आणि नाट्य कार्यशाळा भरविण्यात आली आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रमा पुरुषोत्तम सभागृह येथे १४ मेपर्यंत ग्रिप्स नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहा नाटकांचे दहा प्रयोग होणार आहेत. त्रिशुंड्या गणपती मंदिर, नागेश्वर मंदिर आणि तांबट आळी (९ मे), लाल महाल आणि शनिवारवाडा (२३ मे), भुलेश्वर आणि शिंदे छत्री (२४ मे) येथे सफर-छंद संस्थेच्या सहकार्याने वारसा स्थळांना भेट होणार आहे, अशी माहिती विभावरी देशपांडे यांनी दिली.
‘अ कपल ऑफ मेनी थिंग्ज’
तबला आणि नृत्य बोलांची संवादरूपी जुगलबंदी, ताल आणि नृत्याच्या लयीतून घेतलेला काव्याचा मागोवा, भाषेची सुंदर गुंफण करत नादात्मक काव्यनिर्मिती अशा अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मिलाप – अ कपल ऑफ मेनी थिंग्ज’चा अनोखा आविष्कार रसिकांना मोहित करून गेला. कलासक्त कल्चरल फाउंडेशनतर्फे तबलावादक निखिल फाटक आणि कथक नृत्यांगना-अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी हा कार्यक्रम सादर केला.
झपतालातील पेशकार सादर करताना फाटक यांनी तबला वादनातून उत्स्फूर्तता, अमूर्तता दर्शविली. तर, पेशकाराच्या अंगाने जाणारा थाट शर्वरी जमेनीस यांनी सादर केला. तीन तालातील काव्यमय बंदिशी सादर करत काही नृत्यरचना, तर काही पढंत उलगडले. वाद्य, नृत्यबोल, पक्ष्यांचा आवाज याचा संगम साधणारा ‘परमेलू’ हा प्रकार आणि तिहाईतील बंदिश सादर करून रसिकांचे मन जिंकले.
शर्वरी यांनी लावणी सादर केली. ‘याद पिया की आए’ ही ठुमरी, ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे’ ही होरी, तर ‘बरसन लागे बदरिया रुमझुम के’ ही कजरी शर्वरी यांनी साभिनय नृत्याविष्कारातून सादर केली. त्यांना अबोली देशपांडे (गायन), अमृता ठाकूरदेसाई (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली. फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी, विनिता आपटे, माधुरी वैद्य, महेश गावसकर यांनी कलाकारांचा सत्कार केला.