पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारपर्यंत (८ मार्च) राज्यातील विविध भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार सोमवारी आणि मंगळवारी जिल्ह्यातील ११ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिमी चक्रावाताचा हिमालयीन भागात वाढलेला प्रभाव कायम आहे. दक्षिण राजस्थान आणि आसपासच्या भागात चक्रीय स्थितीची तीव्रता कायम आहे. गोवा ते उत्तर छत्तीसगड पार करून पुढे विदर्भ, तेलंगण, उत्तर कर्नाटक या भागापर्यत द्रोणीय स्थितीचा प्रभाव वाढलेला आहे. परिणामी राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीला केवळ उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. मात्र, राज्याच्या विविध भागांत सोमवारपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.

हेही वाचा >>> म्हाडाच्या ५९१५ घरांसाठीच्या सोडतीचा निकाल लांबला

जिल्ह्यातील २६ धरणांपैकी ११ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला नाही. तसेच पिंपरी-चिंचवड व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातही पावसाची नोंद झालेली नाही. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण आहे. रविवार आणि सोमवारी शहर, उपनगरांसह ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडला असून ११ धरणांच्या परिसरात पावसाने हजेरी लावल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. 

जिल्ह्यातील अन्य धरणांमधील पाऊस मि.मीमध्ये 

पिंपळगाव जोगे १३, माणिकडोह २१, येडगाव पाच, वडज १२, डिंभे २४, चिल्हेवाडी पाच, कळमोडी १४, भामा आसखेड १३, वडीवळे सहा, पवना आठ आणि कासारसाई दोन.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall in six dams in the district pune print news psg 17 ysh
First published on: 07-03-2023 at 20:20 IST