इतिहास हा भूगोलातून शिकविला गेला पाहिजे. भूगोलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहास लवकर समजतो. पण, विद्यार्थ्यांना शिकवावे कसे यासाठी आता शिक्षकांनाच शिकविण्याची वेळ आली आहे. संगीत आणि चित्रकला हे सौंदर्यदृष्टी देणारे विषयच पर्यायी आहेत ही आपल्या शिक्षणाची शोकांतिका म्हणावी लागेल, असे मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले. संगीत आणि चित्रकला विषयासाठी प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
द वाइड अँगल फोरम आणि द रवि परांजपे स्टुडिओ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात वास्तुविशारद सलिल सावरकर यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. ज्येष्ठ चित्रकार रवि परांजपे यांचा वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी सत्कार केला. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘अॅस्थेटिक व्हिजन-द की टू प्रोग्रेस’ हा लघुपट या वेळी दाखविण्यात आला.
वॉल्ट डिस्ने स्टुडिओमध्ये अॅनिमेटर म्हणून काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, राजकीय व्यंगचित्रकार झालो. घरात राजकारण असल्याने राजकारणी झालो. कोणताही विषय मांडताना त्यातील दृश्यात्मकता डोळ्यासमोर उभे करणारे शब्द आपोआप सुचतात. व्यंगचित्र काढण्यासाठी आधी चित्रकला चांगली आली पाहिजे. राजकारणाचा, ज्याचे चित्र काढायचे त्या व्यक्तीचा, त्याच्या स्वभावाचा अभ्यास आणि उपजत विनोदबुद्धी असेल तर व्यंगचित्र चितारता येते, असे सांगून राज ठाकरे यांनी व्यंगावर व्यंगचित्र काढायचे नाही हे तत्त्व आचरणात आणले, असे स्पष्ट केले. मॉडेल कॉलनी प्रभागामध्ये विकसित केलेला आयलंड पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी खर्च किती आला हे विचारले होते. केवळ १५ लाख रुपयांमध्ये हे विकसित केले असल्याचे समजताच त्यांनाही नवल वाटले. मात्र, मुंबईमध्ये साडेचार हजार कोटी खर्चून चांगले रस्ते होत नाहीत. प्रश्न पैशांचा नाही. पण, चांगले दिसले पाहिजे ही आचच कोणाला नाही, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, ९० टक्क्य़ांहून अधिक लोकांचे नगरसेवक, आमदार, खासदाराकडे काही कामही नसते. पण, ज्यांना निवडून दिले त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणार की नाही. पुणेकरांनी स्वत:चा विकास आराखडा करावा आणि तो राबविण्यासाठी दबाब आणावा. नाशिकमध्ये मी अनेक उद्योगपतींना सामाजिक उत्तरदायित्व म्हणजेच ‘सीएसआर’मधून निधी देण्याची विनंती केली आणि विकासकामे सुरू केली. मात्र, ‘सीएसआर’मधील पैसे खायला मिळत नाहीत म्हणून अडवणूक सुरू केली जात आहे. आपले शहर आपणच उत्तम करू शकतो. त्यासाठी पैसे देणारे आणि काम करणारे भरपूर आहेत. पण, ती इच्छाशक्ती असायला हवी. प्रिया गोखले यांनी प्रास्ताविक केले.
मावळलेला उगवतोच ना!
माझ्यावर टीका करताना काहीजण ‘हा मावळलाय’ असे म्हणतात. पण, मावळलेला उगवतोच ना, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर दिले. ‘विझलाय’ म्हटलं असतं तर विचार केला असता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या संवादाची सांगता राज ठाकरे यांनी नारायण राणे यांचे व्यंगचित्र काढूनच केली.
अंगाला लावूनच घ्यायचे नाही
व्यंगचित्रामुळे वाद का होतात, या प्रश्नावर अंगाला काही लावून घ्यायचे नाही असे ठरविले तर कसे चालेल, असा प्रतिप्रश्न केला. दोन द्यावेत-दोन घ्यावेत असा स्वभाव असला पाहिजे. तुम्ही दुसऱ्यावर टीका करता तर मग तुमच्यावर टीका होणारच. त्या टीकेला उत्तर हे दिलेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.